राजीवस्थान


किती वाद घालणार आता! बघा, आपल्या मायबाप सरकारने आपल्या भल्यासाठी किती मेहनत घेतली आहे. आणि तरी काय नाव ठेवता रे? वर्षातला एक दिवस ‘एप्रिल फुल’ असते. पण आपण सर्वच मागील किती तरी वर्षापासून  ‘फुल’ नाही तर ग्रेटफुल झालो आहोत. देश कुणाचा? याचे उत्त्तर खरंच धर्मनिरपेक्ष आहे. मुंबई भले मराठी माणसाची असेल, पण देश ‘राजीव गांधीचा’ आहे. काय एप्रिल फुल करतो अस वाटतं का? . बर, दोन दिवसांपूर्वी दारिद्र्याच्या खालील लोकांसाठीची ‘लाभार्थी’ योजना आता ‘राजीव गांधी लाभार्थी योजना’ झाल्याची बातमी ऐकली का? आमच्या पुण्याचे आयटी पार्कचे नाव  ‘राजीव गांधी आयटी पार्क’ आहे. हे तर सोडा मुंबई, नागपूर, नाशिक, कोल्हापूर, औरंगाबाद, चंदीगढ, बेंगलोरु, भुवनेश्वर, चेन्नई, दिल्ली, गांधीनगर, गुवाहाटी, हैद्राबाद, जयपूर, कानपूर, लखनऊ, मंगलोर, मोहाली, नोएडा, शिमला, तिरुअनंतपुरम्‌ आणि विशाखापट्टणम या सगळ्याचं आयटी पार्कची नावे ‘राजीव गांधी आयटी’ पार्क आहेत. गोवा राज्यातही होणार आहे म्हणे ‘राजीव गांधी आयटी पार्क’. बर ठीक आहे. संगणकाला यायला राजीव गांधी यांनी परवांगी दिली होती, म्हणून कदाचित आठवण म्हणून या सर्व आयटी पार्कची नावे ठेवली अस मानूया.

पण ‘राजीव गांधी’ युनिव्हर्सिटी, अरुणाचलप्रदेश. ‘राजीव गांधी’ युनिव्हर्सिटी ऑफ हेल्थ सायन्स, कर्नाटक. ‘राजीव गांधी’ प्रोद्योगीकी विश्वविद्यालय, भोपळ-मध्यप्रदेश. राजीव गांधी युनिव्हर्सिटी ऑफ नॉलेज टेक्नोलॉजी, आंध्रप्रदेश. बर ते सोडा, अनेक नर्सिंग आणि बायोटेक्नॉलॉजी इन्स्टिट्यूट त्यांच्याच नावाचे आहेत. हैद्राबादचे विमानतळाचे नाव देखील ‘राजीव गांधी इंटरनेशनल एअरपोर्ट’. ‘राजीव गांधी’ आयुर्वेदिक कॉलेज  हे एका नाही तर कांग्रा, उज्जेन. ‘राजीव गांधी गव्हर्मेंट कॉलेज’, रायपूर-छत्तीसगड. काही हॉस्पिटलची नावे देखील ‘राजीव गांधी’ आहे. राजीव गांधी फौंडेशन राहूनच गेल होत. बास! धाप लागली की मला.

आणि अजूनही देश कुणाचा याच उत्तर पटत नाही. बर, मुंबईच्या सी लिंक चे नाव काय? सांगा पाहू. बर अजून आणखीन एक क्लू देतो. आपल्या जवळच्या मनपा, पालिका जे असेल तिथे जा. आणि त्यांना अल्पसंख्यांकांच्या योजनेच नाव विचारा. अजून नाही लक्षात आल? अजून एक क्लू देतो. सरकारच्या महानगर विकास योजनेच नाव… हं आल का? नाही. बर बाबा देश तुमचा. आता खुश ना. पण ग्रामीण भारत विकास योजना, सरकारी शालेय निधी योजना, रेशनिंग दुकानावर येणारे धान्य कोणत्या योजने अंतर्गत येते याची चौकशी नक्की करा. आता आपण सरकारी इमारतींच्या आणि सरकारने बांधलेल्या उड्डाणपूल यांच्या  नामकरणांबद्दल काही नाही बोलायचे. नाही तर मग तुम्ही माझ्यावरच भडकाल. कोणी तरी एका व्यक्तीने अस म्हटलं आहे की ‘नावात काय आहे’. अगदी बरोबर आहे. मग देशाच नाव ‘हिंदुस्थान’ असो किंवा ‘भारत’ नाहीतर ‘इंडिया’ काय फरक पडतो आपल्याला? आणि पुढे जाऊन ‘राजीवस्थान’ केल तरी ‘नावात काय आहे’.

बघा, किती चांगली कल्पना मांडली आहे. पण याचे श्रेय ‘सोनियाला’ जाते. सगळंच जात नाही. पण सिंहाचा वाटा ‘सोनियो’लाच जातो. जातीयवाद, धार्मिक वाद मिटतील. एकच ‘राजीवस्थान’ एकच ‘गांधी’ धर्म. ‘राजीवस्थानी’ हेच आपल राष्ट्रीयत्व. गांधी घराणे हाच आपला इतिहास आणि ‘माझे सत्याचे प्रयोग’ हेच आपले धर्मग्रंथ. मग कशाला हवे भगतसिंग, राजगुरू. आणि कशाला हवे शिवाजी महाराज. एकच पुतळा ‘राजीव’. चीड येत आहे. बर मग संजय गांधी राष्ट्रीय उद्यान बोरिवलीला आहे. तिथ जावून विचार करा. नाहीतर पुणेकरांनो एम.जी रोड खुपंच फेमस आहे. आणि भेळपुरी देखील चांगली मिळते. भेळ खात विचार करा. आत्ताच वेळ आहे. नाहीतर पुन्हा याच देखील ‘जाणता लाजा’ अनुमोदन देईल. आणि परत तीन मंत्रिपदे देखील मिळवेल.  आणि तो राहिला नाही तर २०१४ च्या निवडणुकीनंतर ते होईलच. कारण आपण नेहमीच ‘फुल’ होतो. नाही नाही ‘ग्रेटफुल’ अस म्हणायचं होत मला.


प्रतिक्रिया व्यक्त करा

आपला ई-मेल अड्रेस प्रकाशित केला जाणार नाही.