लव्ह मॅरेज


काल रात्री काकाने घरी मला बोलाविलेले. म्हणून गेलेलो. जेवण झाल्यावर भिंग घेऊन माझ्या पंजावरील रेषा पाहत बसलेलो. घरी आहेत काही पुस्तके त्या हस्तरेषावर दहावीच्या सुट्टीत वाचलेली. दोन मिनिट झाले नसतील तर मैत्रीण आली. झालं, आल्यावर लगेच ‘मुलींचा कोणता पाहतात?’ विचारलं. ‘डावा’ म्हटल्यावर डावा हात दाखवला. आणि मला म्हणाली ‘सांग माझ काय होणार लव्ह की अरेंज मॅरेज?’. तिला सांगितले मला नाही कळत काही त्यातील. तरी ऐकेच ना. एकतर तिचे वागणे आजकाल मला भीतीदायक वाटत आहे.

दीड-दोन महिन्यापूर्वी हॉटेलात गेलेलो. त्यावेळी असाच विषय निघालेला माझ्या लग्नाबद्दल. तिला म्हटलं माझ अस काही नाही. माझा ना अरेंज मॅरेजला विरोध, ना लव्ह मॅरेजला. जरी कोणाच्या प्रेमात पडून मी लव्ह मॅरेज करायचे ठरवले तरी ती आई वडिलांना असेल अशीच पाहिलं. यार मी हे सगळ ‘अप्सरा’बद्दल बोलत होतो. आणि ही खाली मान घालून हसली. तसे माझे लग्नाबद्दल तिचे माझे मत सारखेच आहे. जी कोणी व्यक्ती असेल तिच्या बद्दल आपल्याला आणि त्या व्यक्तीलाही आपल्याबद्दल सर्व काही माहिती असेल. आपल्या इच्छा, भावना त्याला न सांगताच कळतील. आणि त्या व्यक्तीवर डोळेझाकून विश्वास ठेवता यावा. आता यात लव्ह आणि अरेंजचा प्रश्न येतोच कुठे?. माझ्या मैत्रिणीची ठाम धारणा झाली आहे की लव्ह मॅरेजच बेटर आहे.

असो, या विषयावर माझी इच्छा नसतांना सुद्धा खूप जणांनी चर्चा केलेली आहे. जुन्या कंपनीत मी लोकलने जायचो. त्यावेळी देखील असेच. माझे दोन मित्र, ह्यावर वाद घालत बसले होते. एकाच्या म्हण्यानुसार अरेज मॅरेजमध्ये मुलीला आपण पारखून घेतो. आणि ती आपल्या जातीतील असल्याने आपल्या खाण्यापिण्यात, रूढीपरंपरेत अडचणी येत नाहीत. आणि मुळात घरच्यांनी पाहिलेली असल्याने ते नाराज होत नाही. आणि दुसरा, लव्ह मॅरेजमध्ये दोघेही एकमेकांना माहिती असतात. एकमेकांना चांगले समजून घेऊ शकतात. शेवटी मला विचारलेलं मला काय वाटत म्हणून. त्यांना म्हटलं माझ अजून ‘मॅरेज’ झालेलं नाही. तर मला पुन्हा विचारात बसलेलं तू काय करशील? लव्ह की अरेंज मॅरेज? त्यावेळी कुठे होती अप्सरा. त्यावेळी त्यांना म्हटलं बहुतेक आधी माझ ‘मॅरेज’ होईल. आणि नंतर ‘लव्ह’. मग दोघेही हसायला लागले.

माझी बहिणाबाई देखील अशीच. सारख माझ्यावर लक्ष ठेवायची. मी भेटलो की, माझा मोबाईल चेक करायची. आणि दर वेळी ठरलेलं तासाभराच ‘लेक्चर’ याच विषयावर. तिला वाटायचं मी तिच्यापासून लपवतो आहे. मध्यंतरी देखील असंच. मी सलग नकाराची ‘हाइट्रिक’ केल्यावर सुद्धा वडिलांनी हेच तासाभराचे ‘लव्ह मॅरेज’ याविषयाचे भाषण दिले. दोन आठवड्यापूर्वी, माझ्या मित्रांमध्ये असंच विषय निघाल त्यावेळी त्यांनी लव्ह मॅरेज कसे चुकीचे आणि त्यातल्या त्यात आयटी मुलीशी तर नाहीच नाही, असा अर्थ काढलेला. मी काय बोलणार? मला जी आवडली ती तर आयटी मधील आहे. आणि मुळात मला त्यावेळी देखील तिचीच आठवण येत होती. त्यांना मी आपला हो ला हो करीत होतो.

ह्या आठवड्यात झोप माझ्यावर रागावलेली. कुठे गेली कुणास ठाऊक. रात्री येतच नाही. आज त्यामुळे माझी लेट मोर्निंगची बस सुद्धा चुकली. मुळात आजचा दिवसच भंगार आहे. ना कॅन्टीनमध्ये दर्शन ना सकाळी हाय लवकर झालं. असो, एकूणच ‘लव्ह’ मॅरेज करावं तेच चांगल अस मी म्हणत नाही. माझे मतच मुळात लग्न करून फायदा काय अस होत. पण अप्सरा आली, आणि सगळेच बदलेल. आता लग्न तिच्याशी व्हाव अस मनापासून वाटते. आणि हे जे आहे ना लव्ह मॅरेज आणि अरेंज मॅरेज ह्याचा मुल उद्येश काय, की चांगला संसार व्हावा. आता तो जर लव्ह मॅरेजने किंवा अरेज मॅरेजने यापैकी कोणत्याही मॅरेजने होणार असेल तर दोन्हीही मॅरेज चांगले आहे. आणि मुळात सगळेच खुश असतील तर लव्ह मॅरेज करायला काय हरकत आहे.

पण ही पण गोष्ट खरी की दोघांची संमती असेल तर अरेंज मॅरेज देखील चांगले. अप्सराला मी आवडलो तर, तशी मला शक्यता नाहीच्याच बरोबर आहे. कारण अस काहीच घडत नाही आहे की, ज्यामुळे मी ठामपणे तिला माझ्याबद्दल थोडे तरी वाटते अस म्हणू शकेल. आणि जरी तिला आवडलो. तर सर्वात महत्वाची तिची इच्छा, नंतर तिच्या आई वडिलांचे संमती असेल तरच. आणि मला माझ्या घराच्यावर पूर्ण खात्री आहे. की त्यांना ती नक्की आवडेल. त्यामुळे जर अप्सरा असेल तर माझ ‘लव्ह’ मॅरेज नाहीतर.. मला नाही माहित.


प्रतिक्रिया व्यक्त करा

आपला ई-मेल अड्रेस प्रकाशित केला जाणार नाही.