लाडोबा


लाडोबा ऑफिसात पाऊल टाकतो. आपल्या उरल्या सुरल्या केसांची ठेवण ठीक करीत, ‘ए’कारांत  शब्दांची उधळण सुरु करतो. डेस्कवर बसताच त्याला झालेल्या कामाची यादी हवी असते. पाणी प्यायचे असते, पण उठून घेण्याची ‘इच्छा’ नसते. आणि मग त्याचे ते डोळेरूपी घुबडांची भीरभीर सुरु होते. आणि त्या घुबडांना एखादे सावज दिसले. की तोंडाची लढाई सुरु. मग समोर कोणीही असो. ह्याला पाणी आणून देण्यासाठी आर्जव. का तर म्हणे घरी देखील हातात पाणी दिल्याशिवाय हा पीत नाही. जेवतांना देखील तसेच. म्हणजे डबा का आणत नाही? हा मला न सुटलेला प्रश्न.

आता वहिनी डबा देत नाहीत की ह्याला डबा आणायचा कंटाळा हे त्या दोन ‘जीवांना’च माहित. जेवणार का? अस विचारल्यावर नाही म्हणतो. पण त्याला भूक मात्र जाम लागते. मग जणू दुसऱ्यांचे डबे ह्याचेच असल्याचा ‘गोड’ समज तो करून घेतो. नसेल तर कंपनीच्या ‘पॅंट्री’त चिवडा, किंवा मॅगी कुठे आहे? अशी ऑर्डर कम विचारपूस आमच्याकडे करणार. आणि सांगितली तर ते काढून घेण्याचे कष्ट तो घेणार नाही. दुसर्याला पुण्य मिळावे, हा त्यामागील त्याचा स्वच्छ हेतू. मॅगी स्वतः न बनविता दुसर्याला बनविण्यासाठी त्याचा आग्रह. त्यामागील देखील ‘पुण्य’ देण्याचाच हेतू असावा. बर कंपनीतील, ताट वाट्या वापरणार. वापरून झाल्यावर त्या धुणे त्याला बिलकुल आवडत नाहीत. विषय नसतांना देखील स्वतःची वाहावा स्वतःच करीत बसणार. वाद घालण्यात तर ‘रजपूत’. काहीही होवो मागे हटणार नाहीत.

इरिटेट करण्यात कोणीही त्याची बरोबरी करू शकत नाही. मागील आठवड्यात कंपनीची पार्टी होती. नियोजन चुकल्याने हॉटेलात जागा मिळणे कठीण झालेले. वेटरने पाउण तास वेटिंग सांगितले. लाडोबा ने न थकता वेटरला पाउण तास बोर केले. प्रश्न एकच ‘स्पेस झाली का?’ आणि झाली की सांगा. तो वेटर ह्याला कंटाळलेला. पण हा! कदाचित वेळेचा सदुपयोग करण्याचा हेतू असेल. दारू ढोसली. डोळे लाल झाले तरी, मला दारू चढत नाही अस आवर्जून सर्वांना सांगत होता. आणि तेही कोणीही विचारलेलं नसतांना. सकाळी माझ्या डेस्कवरील चित्रकलेच पॅड पाहून ‘हे काय?’ असा प्रश्न त्याने मला केला. मी चित्रकलेचे पॅड अस सांगितल्यावर. त्याच्या प्रश्नाची एक के फोर्टी सेव्हन सुरूच झाली. मग काय? कशाला? कोर्स कुठे आहे? किती महिन्याचा कोर्स? कदाचित मागील जन्मी एफबीआयचा सिक्रेट एजंट होता. आणि शुद्ध मराठीत याला ‘चांभार चौकशा’ अस म्हणतात.

मागील विकेंडला माझ्या कलिग सोबत अर्धा पाउण तास त्या ‘सचिन’वर चर्चा. बर दोघात चर्चा करतांना गावाला आवाज ऐकू जाईल एवढ्या मोठ्या तोंडाच्या स्पीकरची काय गरज? कलिगला सांगत होता की, सचिन सोडून भारतीय क्रिकेट टीम काही कामाची नाही. शेवटी ती ‘सपाट’ महा चर्चेला वैतागून, त्या दोघांना क्रिकेट म्हणजे देशाचे सर्वस्व नाही. क्रिकेटमध्ये भारत जिंकला अथवा हरला तर देशाचे प्रश्न सुटणारे नाहीत अस सांगितले. कलिग समजून गेलेला. पण हा काही शांत होईना. शेवटी मीच वैतागून शांत झालो. तर असा हा. एकदा ब्रॉडब्रँडच्या कस्टमर केअरला फोन केलेला. कस्टमर केअरवालयाला इतकं सतावलं ह्याने की! त्याने एखादा माणूस पाठवून प्रॉब्लेम सोडवतो अस सांगितलं. एकूणच आमचे हे महाशय जाम वेगळे आहेत. वेगळे म्हणण्यापेक्षा ‘लाडोबा’  आहेत. प्रत्येकाला आपल्या ‘हाताखालचा’ समजतात.


प्रतिक्रिया व्यक्त करा

आपला ई-मेल अड्रेस प्रकाशित केला जाणार नाही.