लोकल


ती नेहमीच उशिरा यायची. रोज सकाळी कंपनीत आणि संध्याकाळी घरी यायला उशीर व्हायचा.  कधी खडकीत, तर कधी शिवाजी नगरमध्ये आणि कधीकधी पुणेस्टेशनच्या अलीकडेच अकारण थांबायची. माझा त्रागा व्हायचा. मागील तीन वर्षातले खूपच कमी दिवस असतील की तीची आणि माझी गाठभेट झाली नाही. आम्ही दोघे इतके अचानकपणे विलग होऊ, अस वाटल नव्हत. मोजून शेवटचे पंधरा दिवस उरले आहेत. मी मुंबई असताना आणि आता पुण्यात दोन्हीही ठिकाणी ती माझ्यासोबत होती. मुळात ही कल्पना करवत नाही आहे. खूपच वेगळ वेगळ वाटत आहे. मला आठवत माझा पहिल्या कंपनीची मुलाखतीसाठी आणि मुलाखत झाल्यावर देखील मी तीच्या बरोबर होतो. ती माझ्या जीवनाचा एक अविभाज्य घटकच बनली होती. ती सकाळी भेटावी म्हणून कधी दुध तर कधी नाश्ता सोडून घरातून धावपळ करावी लागायची. ती माझ्यासाठी इतकी महत्वाची बनली होती माझ्या ब्लॉग मधील सर्वाधिक नोंदी तीच्या वरच आहेत. आज घरी येताना याच विषयाने मन विषण्ण झाले होते.

मागील तीन वर्षात सगळच बदललं. माझ्या कंपनी बदलल्या, आणि मी सुद्धा. पण ती कधीच नाही. तीची उशिरा येण्याची सवय अजून देखील आहे. कंपनीच्या पहिल्या पार्टीच्या वेळी ती मध्यरात्री होती म्हणून तरच मी घरी सुखरूप पोहचू शकलो. काहीही म्हणा तीच्यामुळे दिवसाला नवीनपणा होता. अनेक अनुभव आले. नुसत्या वर्तमानपत्रात किंवा टीव्ही वाहिन्यांवरून आलेल्या बातम्या बघून माझ कोणतच मत बनल नाही. याच सार श्रेय तीलाच आहे. रोज नवीन अनुभव. उल्लू आणि ममता यांनी तीच्यासाठी काहीच केले नाही तरीसुद्धा तिने आपल काम अनियमितपणे नियमित केल. माझ्या मनातली तीची जागा कायम तीच राहील. जेवढा नवीन चांगल्या पगाराची नोकरी मिळाल्याचा आनंद होतो आहे तेवढंच तीच्या पासून दूर जाण्याचे दुखं. आता तीला काय म्हणू मी? पण तिने केलेले उपकार कधीच विसरणार नाही. असो, बाकी नंतर बोलूच.


प्रतिक्रिया व्यक्त करा

आपला ई-मेल अड्रेस प्रकाशित केला जाणार नाही.