वाघिणींनो


वाघिणींनो! गेले काही दिवस जे चाललंय ते पाहून बोलल्या वाचून रहात नाही. कसली ती आंदोलने आणि कसल्या मेणबत्या! ही काय न्याय मागायची पद्धत आहे? हे म्हणजे अस झालं की आपल्या घरात सुरक्षित राहता यावं म्हणून घराबाहेरील व्यक्तीकडून अपेक्षा करणे. आपल्या पूर्वजांनी काय हे केलेलं. ती झाशीची राणी, ती काय इंग्रजांपुढे झाशीसाठी आंदोलने किंवा मेणबत्त्या लावत बसली?

मला ना मुळात हेच कळत नाही. स्वतःच्या सुरक्षेसाठी समाजाला दोष देवून काय उपयोग? अरे, तुम्ही वाघिणी आहात. वाघिणींनो तुम्ही महिषासुरमर्दिनी आहात. कालिका माता आहात. हो आहातच! जर मनात आणलं तर असल्या अत्याचार करणाऱ्या ‘लांडग्यांना’ तुम्ही एका पंजात फडशा पाडू शकाल. का सहन करता? बस्स! थोडी हिम्मत दाखवा. तुमच्या जवळ देखील कोणी फिरकू शकणार नाही.

‘चान्स’ मारतोय अस वाटलं की, सरळ गालात वाजवा. पुढची चिंता करू नका. आज ज्या समाजाला नाव ठेवण्याचं काम चालू आहे. तो नक्कीच तुमच्या पाठीशी उभा राहील. शांत राहाल तर सहन करावे लागेल. हा सृष्टीचा नियम आहे. ह्या निर्दयी दुनियेत टिकून राहायचे असेल तर स्वतःचे संरक्षण स्वतःच करावे लागेल. उगाचंच नाही ‘बकरी’ आणि ‘शेळी’लाच कापलं जात. ठरवा, शेळीच बनून भक्ष्य बनायचे. की वाघीण बनून राज्य करायचे.


प्रतिक्रिया व्यक्त करा

आपला ई-मेल अड्रेस प्रकाशित केला जाणार नाही.