वाट लावा


काय बोलव आता! काय चिंधेगिरी लावली आहे. आता माझ्या जुन्या कंपनीच्या सीए नां फोन केला होता. बर ही काही फोन करायची पहिली वेळ नाही. पुन्हा तेच ‘फॉर्म १६ लवकर देतो’. आता ती कंपनी सोडून सात महिने झालेत. माझ्या ह्या कंपनीचा ‘फॉर्म १६’ मे महिन्यातच मिळाला होता. आणि माझ्या जुन्या कंपनीचा गेल्या दोन वर्षाचा अजून फॉर्म १६ येतोच आहे. बंर कंपनी सोडायच्या वेळी मागितला होता. त्यावेळी आमचे पूज्य ‘बॉस’ लवकरात लवकर देतो असं म्हणाले होते. पण नंतर पूज्य दोन तीन महिने कुठल्या समाधित्त मग्न झाले, देव जाणे.

शेवटी कंटाळून मीच फोन केला. मग नुसतंच ‘ठीक आहे’ असं म्हणाले. कधी मिळेल याची भविष्यवाणी काही केली नाही. पुन्हा एक महिने ध्यानात मग्न. मग शेवटी कंटाळून एक दोन ओळीचा मेल खरडला. मग रिप्लाय काहीच नाही. मग पुन्हा पंधरा दिवसांनी मीच फोन केला. मग ‘मी ताबडतोप बघतो’ अशी ‘पूज्य’ बॉसची आकाशवाणी झाली. पुन्हा पंधरा दिवस ध्यान. आता मी जर ‘मेनका’ वगैरे असतो तर त्यांचे ध्यानाच लागले नसते. पण नाही ना मी ‘मेनका’. माझ्यासारख्या मनुक्याला त्यांची ध्यान धारणा मोडायला पुन्हा आठ – पंधरा दिवस गेले. पुन्हा एक मेल खरडला. मग पुज्यांची ‘आकाशवाणी’ मेल मार्फत आली. आकाशवाणीत ‘सी ए नां मनुक्याला मदत कर’ अशी आज्ञा होती.

पुन्हा महिनाभर काहीच नाही. बहुतेक सी ए सुद्धा ध्यानात गेला होता. मग काय त्याचसाठी मनुक्याला फोन करावा लागला. मग त्यानेही ‘या महिना अखेरीपर्यंत तुला फॉर्म १६ मिळून जाईल’ अशी भविष्यवाणी केली. महिन्याच्या शेवटी पुन्हा फोन केल्यावर ‘माझे वडील आजारी आहेत. त्यामुळे मला वेळ नाही मिळाला’. मग आता मी देखील काय बोलणार? ‘ठीक आहे’. असं म्हणून फोन ठेवला. आता पुन्हा फोन केल्यावर ‘तुला कशाला पाहिजे फॉर्म १६?’ असा उलट प्रश्न केला. झाले! एवढेच बाकी राहिले होते. सीएचा ‘जमदग्नी’ झाला. त्यांना पुन्हा गोडीत ‘माझा या कंपनीत प्रमाणापेक्षा अधिक टॅक्स कट झाला म्हणून रिटर्नसाठी फॉर्म १६ हवा होता’ असं म्हणालो. मग स्पष्टच बोलायचे झाले तर ‘नन्ना’चा पाढा सुरु केला होता. कशीबशी गाडी पुन्हा रुळावर आणली. मग सीएची पुन्हा एक भविष्यवाणी ‘या आठवड्यात तुला फॉर्म १६ मिळून जाईल’.

आता ज्या कंपनीत काम जास्त असल्यावर रात्री दहापर्यंत बसून कामे केली. सुट्टीच्या दिवशी घरून कामे करून दिली. म्हणजे सकाळी दहाला ऑफिस सुरु व्हायचे. आणि पाच दहा मिनिटे इकडे तिकडे झाले की सकाळी पूज्य बॉसची ‘दिव्यवाणी’ ऐकायचे. पण काम जास्त असेल तर मग तीच दिव्यवाणी कधी ‘प्रेमवाणी’ किंवा ‘उपकारावाणी’ कधी झाली नाही. ती प्रेमवाणी फक्त या माझ्या ‘बाबूमोशाय’ सिनिअरसाठीच. त्याने काम करो अथवा करो. सुट्टी घेतली, किंवा उशिरा येओ. न सांगता सुट्टी घेतली तरी कधी पूज्य ‘कठोरवाणी’ वापरलेली मी कधी बघितलेली नाही. हे असच असत ‘आमची मातीतील माणस, आम्हाला आमच्याच मातीत गाडतात’.  सोडा, माझे आज जाम डोके सरकले आहे. बघुयात आता काय होते ते!


प्रतिक्रिया व्यक्त करा

आपला ई-मेल अड्रेस प्रकाशित केला जाणार नाही.