वाद


जगाच्या पाठीवरील इतर दुसऱ्या कोणत्याच देशात इतके वाद होत नसतील. जितके आपल्या देशात होतात. कोणी काही बोलले तरी वाद. नाही बोलले तरी वाद. इतर काही घडो न घडो ‘वाद’ मात्र हमखास घडतात. निमित्त काहीही असते. वर्ष सुरु होवून कसाबसा महिना झाला तर, पंधरा-वीस वाद. आजकाल वादावरून गोष्टीची किंमत ठरते.

जितका मोठा वाद तितकी त्या गोष्टीची प्रसिद्धी मोठी. आणि दर्जाही मोठा. वाद नाही तर त्याच्याकडे कोणी ढुंकूनही पाहत नाही. लोकशाहीचा वाद हा अविभाज्य अंग बनला आहे. बर वाद पण साधे सुधे नाहीत. अगदी हाणामारी झाल्याशिवाय त्याला महत्व प्राप्त होत नाही. वादाचे विषयाची यादी करायची झाल्यास, हा वादाचा विषय आहे की हास्याचा तेच कळेनासे होते. पण एक मात्र आहे, ह्या रोज घडणार्या नवनव्या वादांमुळे, लोकांच्या घरातील वाद नक्कीच कमी झालेत.

खरे तर ‘वाद’ ही देशाची पिढ्यानपिढ्या जतन केलेली एक संस्कृती. जी आता देशाची प्रकृती बनली आहे. मी मस्करी बिलकुल करीत नाही आहे. सांगा बर, शिवाजी महाराजांचा जन्म दिनांक? किंवा कोणता जयंती दिवस?. आता ह्याच वादाला जवळपास दीडशे वर्ष, बहुदा अधिक झालेत. असे अनेक परंपरागत ‘वाद’ आहेत. जे अजून शे दीडशे वर्ष असे चालू राहतील. जास्ती वादात पडत नाही. नाहीतर यावरही ‘वाद’ निर्माण होतील.


प्रतिक्रिया व्यक्त करा

आपला ई-मेल अड्रेस प्रकाशित केला जाणार नाही.