विकेंड


हा विकेंड जाम मस्त गेला. काय सांगू आणि काय नको अस होत आहे. गेल्या एक महिन्यापासून मी स्वतःला एकटा राहूच देत नाही. एकटा असलो की! नको नको ते विचार मनात यायला लागतात. असो, शुक्रवारी संध्याकाळी माझ्या मुंबईच्या बहिणीचा फोन आलेला की, ती शनिवारी पुण्यात येणार म्हणून. तो येरवड्या जवळचा ‘ईशान्य’ मॉल आहे ना. तिथे तिचा कार्यक्रम होता गाण्याचा. दुपारी गेलेलो. तिच्याबद्दल काय बोलू? माझी ‘दुसरी बहिणाबाई’ आहे. गाडी पाहून जाम खुश झालेली. खर तर तिच्याकडे दोन टू व्हीलर आणि एक फोर व्हीलर. पण तरीही माझी गाडी पाहून तिला आनंद झालेला. मस्त वाटल. तिचा कार्यक्रम झाल्यावर, तिला लगेचच मुंबईला निघायचे होते. तस् आमच्या बऱ्याच गप्पा झाल्या.

मॉलपासून पुणे स्टेशनला गेलेलो. पण तिचा प्लान चेंज. पुन्हा मॉलला जाऊयात म्हणालेली. तिच्या ग्रुपच्या दोन बसेस होत्या. प्रत्येक वाक्यात तिचे नुसते विनोद. हसून हसून पोट दुखवलं. असो, तिच्यावर बोलायचे झाल्यास एखाद दोन नोंद सहज होईल. तिथून पुन्हा येरवड्याला आल्यावर घरी जायची इच्छा खूप झालेली. वाटलेलं, आता असंच पुढे निघावे. माझ्या बंधुराजांनी शनिवारी बाईक घेतली. बजाज डिस्कवर. चला काही का असेना, घरातील अतृप्त आत्मा शांत झाला. जवळपास, बिचारा एक वर्षापासून बाईक घेऊ का म्हणून वडिलांच्या मागे लागलेला. बर, पैसे देखील जमा करून ठेवलेले. पण वडील काय होकार देत नव्हते. आणि मी न मागताच मला बाईक घेऊन टाक अस म्हणत होते.

शेवटी गाडी घेतली एकदाची! संध्याकाळी मी आणि माझा मित्र त्या कॅम्पमध्ये टिवल्या पावल्या करीत बसलेलो. मित्र गाडी चालवत होता. काय गाडी चालवली त्याने. रस्त्यावर व्यवस्थित. आणि सिग्नलला आरटीओ पोलीस दिसला की, ह्याचे गचके चालूच. म्हटलं आता नक्की पोलीस पकडणार. पण वाचलो. जेवण करून काकाकडे गेलो. आजकाल मी माझी बाईक काकाकडेच लावतो. कारण, माझ्या घरासमोरील रस्त्याची कामं चालू आहेत. इतका धुरळा उडतो की, बोलायची सोय नाही. त्यात पार्किंगची व्यवस्था अजून नीट नाही. त्यामुळे काकाकडे ठेवतो. रात्री गेलो तर, मैत्रीण हजर. आईस्क्रीम खायला जाऊयात म्हणाली. यार, ती अजून आहे तशीच आहे. हीला थंडीत आईस्क्रीम खावेसे वाटते. गप्पा मारतांना माझी छोटी कार्टून बहिण तिच्या डोक्यात पुन्हा हवा भरत होती. तस् भरायची गरज दिसत नाही. खर सांगू का, मला या विषयावर काहीच बोलायची इच्छा नाही. रविवारी नगराचा एक मित्र, माझ्या याआधीच्या कंपनीत आहे. तो आलेला.

संध्याकाळी, माझा एक मित्र मला पार्टी देणार होता. त्यासाठी पुन्हा बाईकवर चिंचवड ते पुणे. त्याला चक्कर मारू म्हटलं तर, जाम घोटाळा झाला. त्या डेक्कनच्या गरवारे पुलावरून सरळ अलका टॉकीजकडे जाणाऱ्या पुलावरून निघालो तर पोलिसांनी पकडले. कारण विचारले तर, टू व्हीलर्सला त्या पुलावर नो एन्ट्री आहे अस म्हणाले. बाईक तो चालवत होता. सुरवातीला लायसन्स मागितले तर त्याने दिले. लगेच बाजूच्या चौकीत घेऊन गेले. ती महामाया, जणू आम्ही कोणाचा खून वगैरे केलेला आहे अशी भाषा. यार, जाम डोक सरकल होत. माझा मित्र फोन लावत होता. आणि ही मला म्हणाली ‘नो एन्ट्री मध्ये कसे घुसालात?’. तिला म्हटलं ‘माहिती असत तर नसतो घुसलो’. मला म्हणाली ‘माहित नव्हत म्हणजे काय?’. आता मला सांगा, हे कुठेच कोणताच बोर्ड लावत नाहीत. ह्यांच्या मनाचे राज्य. वाटेल तो वन वे, वाटेल तिथे नो एन्ट्री. बर नो एन्ट्रीची काहीतरी खुण असायला हवी ना! कस कळणार की नियम काय आहे ते. ह्यांच्या गाढवपणामुळे वर्षभरापूर्वी त्या जंगली महाराज मंदिरासमोर एका चार वर्षाच्या पोराचा जीव गेला. तिच्याकडे पाहिल्यावर, थोडी शांत झाली.

मग म्हणाली, ‘गाडीच रजिस्ट्रेशन केलेल आहे का?’. मी ‘हो’. ती महामाया ‘मग कागदपत्र कुठे आहेत’. तिला म्हटलं इथ नाहीत. हव तर आणून दाखवतो. मग म्हणाली, किती किलोमीटर झाले?. तिला म्हटलं ‘अडीचशे’. महामाया ‘कंपनीने नियम सांगितला नाही का?’ मी ‘कोणता नियम?’ मला म्हणाली की, ६७ किमी पेक्षा जास्त गाडी चालवता येत नाही, विदाऊट रजिस्ट्रेशन. यार, ही काय बडबडत होती. तिला म्हटलं रजिस्ट्रेशन झाल्यावर फिरवता येते ना?. मग कुठे काय बोलती. शांत झाली. मला म्हणाली, लायसन्स कोणाचे आहे? तिला म्हटलं मित्राचे. मग म्हणायला लागली त्याला बोलवा. मी त्याच्याशी बोलेल.

तो माझ्याही पुढचा. एका आरटीओ पोलिसाला फोन करून आला. तिला म्हटला, माझ्या मावस भावाशी बोला. ती म्हणाली कोण आहे तुझा मावसभाऊ? तर हा ‘आरटीओ मध्ये पोलीस आहे’. मग ह्या महामायेने फोन उचलला. हो नाय केल. आणि बाहेर जावून थांबा अस म्हणाली. बाहेर आल्यावर रंगात आलेली. सगळे असेच का हेच कळत नाही. आम्हाला म्हणत होती विदाउट रजिस्ट्रेशन गाडीचा फाईन अकराशे रुपये आहे. अस दोन तीनदा सारख तेच. तिला पैसे, हवे होते. थोडक्यात, तिचा फाईन. तिला काहीच नाही म्हणलो. मग दिले निमुटपणे लायसन्स. मला आजकाल, ह्या ‘सरकारी भिकारीं’ना कस ट्रिट करायचे आहे हे चांगलच माहित झाल आहे. सोडा, रात्री पार्टीनंतर घरी आलो. नेहमीप्रमाणे झोप काय लवकर आली नाही. सकाळी उठलो तेव्हा अकरा वाजलेले. एकूणच मस्त विकेंड गेला.


प्रतिक्रिया व्यक्त करा

आपला ई-मेल अड्रेस प्रकाशित केला जाणार नाही.