विश्व


प्रत्येकाचे वेगवेगळे विश्व. विश्व नेमके कोणते हाच प्रश्न पडावा इतके भिन्न भिन्न. कुणाला संगीताची आवड. तर त्याला जिकडे तिकडे सुरांच्या मैफिली दिसतात. तर कुणी, ‘राजकारण’ पाहून त्यात रमलेले. प्रत्येकाला, आपआपल्या विश्वात आणि त्यात असणाऱ्या/जाणवणाऱ्या गोष्टींचे अप्रुफ. आणि प्रत्येकाला त्या विश्वातून डोके काढून बाहेर पाहायला वेळच नाही. प्रत्येकाची ‘जीवनाची’ समीकरणे वेगवेगळी. आणि प्रत्येकाच्या ‘सूत्रांनी’ आणि त्यांच्या अनुभवाच्या प्रमेयांनी जीवनाची गणिते सोडवून बाकी शून्य आलेली.

नक्की ‘जीवन म्हणजे काय?’ आणि ‘आपण कशासाठी जगात आहोत?’ असा प्रश्न केल्यास प्रत्येकाचे हरहुन्नरी जबाब. कुणाला जगणे म्हणजे ‘भोग’ वाटतात. तर कुणाला मरेपर्यंत अखंडित चालणारी शर्यत. आणि अनेकांना प्रश्न पाहून चेहऱ्यावरच प्रश्नचिन्ह निर्माण होते. पण एका गोष्टीत एकमत. जीवनचा ‘अर्क’ जवळ असल्याचा आभास. परंतु, का कुणास ठाऊक अर्क पिऊन देखील स्वतः कायम दु:खी. पण एक मात्र निश्चित अनुभवातून तयार झालेला ‘अर्क’ दुसर्याला पाजण्यात. नव्हे तर जणू तेच ‘अमृत’ असल्याचा विलास करीत दुसऱ्याच्या गळी उतरवण्यासाठी प्रत्येक जण धडपडत असतो.

सांगण्याचे तात्पर्य असे की, तो अर्क त्यांच्या विश्वमंथनातून निर्माण झाला असल्याने सर्व ‘महादेव’ आणि ‘मोहिनी’ अमृत कलश इतरांच्या गळी उतरवण्यास आतुर असतात. आपले विश्व, किती खरे आणि किती प्रचंड याचा मुळी कोणी विचारच करीत नाही. कुणाला पगारवाढ तर कुणाला ध्येयपूर्तीचे वेड. कुणाला अध्यात्मात विश्व, तर कुणाला पैशात. आणि त्याचे प्रमेय बनू लागते. असे विश्व किती आणि व्याप्ती किती याचा अंदाज बांधणे म्हणजे सुताने स्वर्ग गाठणे आहे नव्हे काय?


प्रतिक्रिया व्यक्त करा

आपला ई-मेल अड्रेस प्रकाशित केला जाणार नाही.