विषय लग्न


मी खरच खूप कंटाळलो आहे, या लग्न विषयाला. आजकाल जो पहाल तो, हाच एक विषय चघळत असतो. माझ्या नातेवाईकात आणि घरी जणू हा राष्ट्रीय प्रश्न निर्माण झाल्या प्रमाणे चर्चा. बर कितीदा अस खोटे खोटे आनंदी आहे दाखवायचे?. मागील आठवड्यात वडिलांना बाईक कधी आणू यासाठी फोन केला, तर त्यांचेही तेच. बाईक आणली. पूजा करतांना तो कार्टून माझा मित्र, काय ते ‘त्वरीतात त्वरितं विवाहे संपन्न..’ अस काहीस म्हणत होता. पूजा गाडीची, आणि हा बोलतोय काय? त्याच्याकडे पाहिल्यावर हसायला लागला. बहिणाबाई तर विचारूच नका. एखाद्या कार्यक्रमात गेली की, येतांना एखादी आवडलेल्या मुलीची माहिती घेऊन येते. जवळपास सर्वच नातेवाईकांना हा ‘छंद’ जडून गेला आहे.

मध्यंतरी आई आलेली. अरे यार, ही आई न गेल्या एक वर्षापासून ‘लग्न’ सोडून दुसरा तिसरा विषयच नाही. बर मी त्यांना स्पष्ट देखील केल आहे. मागील आठवड्यात वडील फिरून फिरून त्याच विषयावर येत होते. मग त्यांना ‘तुम्ही जस् म्हणाल तस्’ अस सांगितलं. मग खुश झाले. यार, मी मागील पाच सहा महिने सोडले तर हा विषयच काय परंतु दुसऱ्या कोणत्याही विषयावर त्यांना हव तस् आणि हव ते केल आहे. तरी सुद्धा ना, आई काय आणि वडील काय हाच विषय सारखा. बर, मला आता कोणीही चालेल. जिला मी आवडेल. आणि आई वडिलांना ती आवडेल. बस्स! माझी काहीच अपेक्षा नाही. नाहीतरी आता मला हा विषय संपून टाकायचा आहे.

एखादा मित्र पिंग करतो. आणि मला ‘मी सुद्धा उमेदवारी अर्ज भरला आहे’ अस बोलू लागतो. मी त्याच्याबद्दल बोलतो आणि हा माझ ‘कुठपर्यंत आलंय’ अस बोलतो. मी घर घेतलं अस म्हटलं की ते, ‘छान! आता स्वयंपाकाची सोय करून टाक’. मी बाईक घेतली बोललो की, ‘आता गाडीवर मागे बसायची सोय करून टाक’. कुठलाही विषय असू द्या. ‘नवीन जॉब’ म्हटलं की, ‘चला, आता पैशांचा प्रश्न मिटला. एकाचे दोन करायला मोकळे’. अरे काय चाललं हे? मी बोलतो एका विषयावर आणि ते त्याचा अर्थ भलताच काढतात. सकाळी माझ्या दुसऱ्या बहिणीचे मिस्टर उर्फ दाजी हेच. बाईक पाहिली आणि सुरु झाले. ‘बर केलंस, लग्नाआधी या गोष्टी करायला हव्याच. जॉब, घर आणि बाईक.चांगले काम केलंस. लग्नाचे काय म्हणतो आहेस?’ अस म्हणत होते. कसाबसा सटकलो.

त्यामुळे ना आज, जाम डोक दुखायला लागलं आहे. जेवणाचा विषय निघाला तरी हेच. आणि दुसरा कोणता विषय निघाला तरी हेच. खरच मला नकोसा झाला आहे हा विषय. परवा देखील असंच. त्या सिटीप्राईड वालीचा फोन ‘तुम्हाला जोडीने यायला जमेल का?’. ‘कशाला?’ विचारल्यावर स्पर्धेचा निकाल घेण्यासाठी ‘जोडी आवश्यक’ आहे अस म्हणाली. काय यार, माझा विरोध नसतांना देखील हे सगळे इतका अतिरेक करीत आहेत ना. बर, आई वडील देखील तसेच. शंभर स्थळ ह्यांच्याकडे येणार. त्यातील भाजीपाला निवडावे तसे पाच दहा निवडणार. त्यातून अजून गाळून एखादे स्थळ यांना पसंत पडणार. आणि सगळ झाल्यावर त्यांना स्वभावाने सुद्धा चांगली हवी. त्याचं सुद्धा ऐकायला हव. माझ सुद्धा तिने ऐकायला हव. जास्त श्रीमंत कुटुंबातील नको. फारच लाडावलेली नको. स्वयंपाक यायला हवा. जॉब करेल का?. किती अपेक्षा यार ह्यांच्या.

बहिणाबाई तर त्याहून पुढची. दिसायला सुंदर पाहिजे. काय यार, कधीकधी ह्यांच्या गप्पा ऐकल्यानंतर ह्यांना मुलगी हवी की ‘शो पीस’ तेच कळत नाही. आणि ह्या सगळ्यांना मी फार ‘भोळाभाबडा’ वगैरे वाटतो. मी काय बोलायचं म्हटलं की, मलाच शहाणपण आणि सल्ले. बर, हे सगळ पाहतांना त्यांचा ‘पीस’ म्हणजे मी काय आहे हे पहातच नाहीत. एकतर मी इतका ‘सुंदर’. त्यात माझ्यात काय? हेच कळत नाही. माझी खरच काही अपेक्षा नाही. न इच्छा. आता याचा काहीच वेगळा अर्थ नको. ती जशी असेल तशी. ती जस् म्हणेल तस्. आणि तिची जी इच्छा असेल ती इच्छा. माझी कधीच काही हरकत नाही. बस, फक्त आई वडिलांना खुश ठेवल्याशी कारण. असो, आतापासून तो विचार नको. मनाला समजावणे जाम अवघड असते.


प्रतिक्रिया व्यक्त करा

आपला ई-मेल अड्रेस प्रकाशित केला जाणार नाही.