वेड असावे


प्रत्येक व्यक्तीला कोणत्याना कोणत्या गोष्टीचे वेड असते. म्हणजे, कंपनीत माझ्या बाजूला बसणारा माझा मित्र. त्याला क्रिकेटचे जाम वेड. कोणताही सामना चालू असो. हा त्याच्या अपडेट्स घेताच राहणार. एका बाजूला काम चालू आणि दुसऱ्या बाजूला  अपडेट्स.

माझ्या जुन्या कंपनीतील एक मित्र. त्याला गाणी ऐकण्याचे वेड. कायम हेडफोन त्याच्या कानात. अगदी त्या बॉशरूममधेही तो हेडफोन घालून गाणी ऐकणार. माझ्या मित्राच्या रूमवर बसलेलो असतांना, त्याच्याकडे असाच एक जण आलेला. त्याला गाण्याचे वेड. ह्याने थोडा आग्रह केला तर चांगली दोन-चार गाणी म्हणून दाखवली. ‘गळा’ खरंच चांगला होता. कुठल्याशा गायनाच्या स्पर्धेत सहभागी होण्यासाठी संगमनेरहून आलेला. माझ्या वडिलांना ‘वाचनाचा’, तर माझ्या काकाला ‘व्यंगचित्र’ काढण्याचे वेड आहे. थोडक्यात, प्रत्येकालाच कुठल्याना कुठल्या गोष्टीचे वेड हे असतेच. आणि असायलाही हवे. त्याचे अनेक फायदे आहेत.

एखादे किचकट किंवा आधी न केलेले काम करतांना अनेकदा वेळ लागतो. सतत एकच काम करून हळूहळू कामाचा ताण जाणवू लागतो. काही वेळाने तर कामच नकोसे करून टाकते. त्यावेळी विरंगुळा म्हणून आवडीची गोष्ट काही क्षणात कामाचा ताण काढून टाकते. कदाचित अनुभव असेल. पुन्हा ताजेपणा येतो. माझ्यासारख्या डिझायनिंगमधील माणसाला विचारलं, तर आमचं ‘आई’वर विशेष प्रेम. आई म्हणजे इंटरनेट एक्सप्लोरर(आय ई). त्यामुळे आईला सांभाळतांना नाकीनऊ होतात. त्यावेळी वेडाचा उपयोग खूप चांगल्या प्रकारे होतो.

मला मोबाईल, टॅबलेट आणि कम्प्युटर सारख्या गॅझेटसचे फार वेड. परवाचीच गोष्ट, कंपनीत आयपॅड मिनी मिळालेला. म्हणजे कामा निमित्त मिळालेला. काय सांगू, दिवसभराचे काम तासाभरात. आयफोन फोर एस मिळाला. त्याही वेळी असंच झालेलं. त्यामुळे एखाद्या गोष्टीत वेड असणे फारच फायद्याचे. दैनंदिन जीवनात अनेक कटू प्रसंग येतात. अनेकदा घरातील अथवा कामातील गोष्टीमुळे मनस्ताप सहन करावे लागतात. कधीकधी यामुळे अस्वस्थता निर्माण होते. कलह निर्माण होण्याची शक्यता बळावते. ठरवूनही मन शांत होत नाही. त्यावेळी ‘वेड’ न काही करताच, बरेचकाही अनावश्यक गोष्टी टाळू शकते. त्यामुळे म्हणतो, वेड असावे!

, ,

प्रतिक्रिया व्यक्त करा

आपला ई-मेल अड्रेस प्रकाशित केला जाणार नाही.