व्यक्ती तितक्या प्रकृती


व्यक्ती तितक्या प्रकृती असतात. अन कितीही गमतीने घेतलं तरी हेच खरं आहे. प्रत्येकाला येणारे अनुभवावरून प्रत्येकजण त्याचा दृष्टिकोन ठेवतो. कुणाला अमुक विषय महत्वाचा वाटतो. तर कुणाला अमुक मत पटत नाही. माझ्यामते ह्यात काहीच गैर नाही.

एखादी व्यक्ती अशी का याचे उत्तर शोधायचं झाल्यास त्याचे अनुभव ऐका. आपल्याला कोडे उलघडेल. ते लक्षात आल्यास तो व्यक्ती असा का याची कारणे समजेल. अनेकदा त्यांच्या दृष्टिकोनामागील वस्तुस्थिती माहित नसल्यानं प्रश्न निर्माण होतात.

गमतीचा भाग असा की, प्रत्येकालाच आपण करतोय तेच योग्य वाटते. अन ते इतरांनाही वाटावे असा त्याचा आग्रह असतो. यात मी देखील मोडतो. पण इतरांनाही त्यांची मते असतात. अन तीही आपण स्वीकारायला हवीत. याबाबत मी व्यक्तिशः प्रयत्न करीत आहे.

खरं तर आपण स्वतःमध्ये या गोष्टी अंगिकारायला हव्यात. अनेकदा आपण एखाद्याविषयी अकारण गैरसमज निर्माण करून घेतो. त्यामागची पार्श्वभूमी समजून घेतली तर अनेक गोष्टींचे कोडे उलगडू शकते. खरं तर असं वैचारिक काही मांडव असा नोंदीचा हेतू नव्हता.

परंतु, आपल्याकडे गेल्या अनेक वर्षांपासून सगळं काही मनोरंजनात्मक! असं झाल्याने, प्रत्येक गोष्ट मनोरंजन म्हणून पाहिली जाते. मग त्या दैनंदिन घडामोडी असोत वा अन्य. वर्तमानपत्रांचे मथळे व बातम्या पाहिल्या की हे सहज लक्षात येण्याजोगे आहे. त्यामुळे अशा विषयावर अन अशा पद्धतीने व्यक्त व्हावे असा हेतूही नव्हता. असो!!

एकूणच पस्तीशीनंतर आपोआपच समजूतदारपणा वाढतो. हे मी माझ्या अनुभवावरून सांगत आहे. हा बदल खऱ्या अर्थाने चांगला आहे. समोरील व्यक्ती हा स्वतंत्र आहे अन त्याला त्याचे स्वातंत्र्य जपण्याचा अधिकार आहे. ह्याची आपल्या मनाला समजूत घातली तर अनेक गोष्टी सहजपणे सुटतात.

गेल्या काही काळापासून हवामान आश्चर्यकारकरीत्या बदलत आहे. त्याचा थेट परिणाम जीवसृष्टीवर होत आहे. त्यामुळे आजकाल प्रत्येकाच्या जीवनात तणाव फारच वाढलेला आहे. ह्याचा विचार करून आपण आपल्या सानिध्यात येणाऱ्या लोकांना कसे तणावमुक्त ठेऊ शकतो. आपली प्रेमळ बंधने किती कमीत कमी लादू याचा आपण सर्वांनी विचार करायला हवा.

माझ्या दोन्ही चिमुकल्यांचे स्वभाव अगदी भन्नाट आहेत. मोठ्या राणीसरकार कैवल्याचा पुतळा आहेत. तर लहान राणीसरकार दंगेखोर! त्यांच्या स्वभाव पाहता अनेकदा याचा प्रत्यय येतो. तूर्तास इतकेच. बाकी बोलूच!!

,

प्रतिक्रिया व्यक्त करा

आपला ई-मेल अड्रेस प्रकाशित केला जाणार नाही.