व्यवसायातील कानगोष्टी


गेले अडीच वर्षांपासून मी वेबसाईट डिझायनिंगचा व्यवसाय करतो आहे. त्याआधी साधारण नऊ वर्षे ह्याच क्षेत्रात नोकरी केलेली. व्यवसायात सुरु करण्यापूर्वी साधारण कधीही व्यवसाय न केलेल्या कुटुंबात ज्या सगळ्या गोष्टी घडतात तेच घडलेलं. घरच्यांना खरं तर हा धक्का होता. व त्यांना तो निर्णय अजूनही अनाकलनीय वाटतो. लाखभराचा महिन्याला खात्यात जमा होणारी नोकरी सोडून सगळंच अनिश्चित असलेल्या गोष्टीत पडायचं कशासाठी हा त्यांचा प्रश्न होता!

असो! जेंव्हा व्यवसायास सुरवात केली तेंव्हा काही ऑनलाईन माझ्या व्यवसायाशी संबंधित कामे मिळाली. नंतर ओळखीतील लोकांना केलेल्या कामाची माहिती द्यायला सुरवात केली. सुदैवानं काम मिळत होती. सुरुवातीचा फार मोठा काळ हा कामाची रक्कम सांगतांना किती सांगाव हे कळत नसायचे. काम मोठं असलं तर रक्कम मोठी असायला हवी! पण माझ्याकडून ते गणित चुकायचं! ते गणित जुळायला फार काळ गेला.

जवळपास दोन वर्ष घरूनच काम केलेलं. पुढे जाऊन काकाच्या घराच्या बाहेरच्या खोलीत छोटेखानी कचेरी/कार्यालय बनवलं. घरून काम करतांना सर्वात मोठी अडचण म्हणजे ग्राहकांना भेटायचे म्हटले की ते संकोच करायचे! काही काळ भेटाभेटीचे कार्यक्रम बाहेर करावे लागले. पण कामासाठी एक ठराविक जागा (घर नव्हे) असलेली उत्तम! जेणेकरून तुम्हाला मुक्तपणे काम करता येते.

आणखीन एक महत्वाची गोष्ट तुम्ही काम करता हे लोकांना माहिती असायला हवं! सोप्या भाषेत याला मार्केटिंग म्हणतात. सध्याच्या काळात याला पर्याय नाही. मग आता हे मार्केटिंग कसं करायचं ज्या त्या व्यवसायावर व ग्राहकावर अवलंबून असते. म्हणजे उदाहरणार्थ इन्स्टिट्यूट असेल तर आजूबाजूच्या परिसरात बोर्ड, पॉमप्लेट अथवा लोकांना दिसेल अशा ठिकाणी असावे.

सर्वात महत्वाचे तुम्ही ज्या ग्राहकाला सेवा देत आहात. तो जर समाधानी असेल तर तो तुम्हाला तुमचा व्यवसाय वाढवण्यास मदत करतो. अन्यथा तुमचा तो बाजार देखील उठवू शकतो. त्यामुळे ग्राहकाला राजाप्रमाणे मान हा दिलाच जायला हवा! तसा मी व्यवसायात नवखा आहे पण अनुभवलं ते शक्य होईल तसं मांडण्याचा प्रयत्न केला. आपल्याला यात सुधारणा करावीशी अथवा अजून आपले अनुभव सांगावेसे वाटले तर ते माझ्यासाठी अधिक उपयुक्त होईल!


प्रतिक्रिया व्यक्त करा

आपला ई-मेल अड्रेस प्रकाशित केला जाणार नाही.