संकल्प ही जगातील सर्वात विनोदी गोष्ट आहे. हो! पण मी हा विनोद करीत नाही आहे. प्रत्येक जण हा विनोद दरवर्षी करीत असतो. दरवर्षाच्या सुरवातीला संकल्पांचा ऋतू सुरु होतो. साधारण जानेवारी महिन्यात सुरु झालेला हा ऋतू याच महिन्यात संपून देखील जातो. त्यामुळे मला, संकल्पाला काही अर्थ नाही अस पटलेलं आहे. आता सरकार नाही का करीत हा विनोद दर पाच वर्षाला! त्या ‘अर्थसंकल्पाला’ काही ‘अर्थ’ असतो? नुसत्या गप्पा.
आपण नाही का ठरवत या वर्षात मी अमुक करणार, तमुक झालंच पाहिजे. एक तारखेला करतो. पंधरा-वीस दिवस थोडा फार टिवल्या पावल्या होतात. आणि नंतर पुन्हा जैसे थे! नंतर नवीन वर्ष येते आणि आपण पुन्हा तेच करतो. ज्या गोष्टी नाही करू शकत किंवा होणारच नाही अशा गोष्टी म्हणजे ‘संकल्प’. मध्यंतरी ‘द ग्रेट कॉमेडियन’ राहुल नंदी उर्फ बाबा चिंचवडमध्ये आलेला. एकाने त्याला ‘लोकल’ वेळेवर नाहीत, पीएमपीएलच्या त्रासाबद्दल विचारलं.
तर बाबा जपानच्या एका सेकंदात स्टेशन धावणार्या लोकलचे उदाहरण देवून ‘संकल्पच’ असावेत अस सांगितले. आपल्या मनीसिंहने देखील ‘जो जे वांछील तो ते राहो’ असा संकल्प केलेला. परंतु तो पूर्ण झाला की नाही, याचे उत्तर सापडणे फार काही अवघड नाही. संकल्प काय करावे, याचा असा काही ठराविक नियम नाही. पण संकल्पात आणि ‘घोषणेत’ यात काही फार अंतर नाही. नेते घोषणा करतात आणि आपण ‘संकल्प’!
मी तर कधीच कुठलाच संकल्प करीत नाही. शाळेत असतांना अभ्यासाचा साधा संकल्प कधी केला नाही. आणि आता काही करणे तर दूरच! पण विनोद मात्र होतात. आपल्या सरकारने शेतकर्यांना फुकट वीज देण्याचा असाच एक विनोद केलेला. आणि ते जावई बापू आलेले, तेच हो जनाब कसाब. त्यावेळी शहीद पोलिसांच्या घरी दहा लाख रुपये देण्याचा विनोद केलेला. यावर बाकी ‘खो खो’ तर सहज मिळेल. जाउ द्या, कशाला? नाहीतर असे एक एक विनोद मी बोललो तर हसून हसून पुरेवाट होईल.
बाकी, मी असे फार काही विनोद केलेले नाहीत. मागील वर्षी ‘रोज एक नोंद लिहायचा’ केला होता, परंतु तो बर्यापैकी पूर्ण झाला. तुम्ही काय केलेलात?