संकेत


संकेत म्हणा किंवा पुर्वाभास. पण जीवनातील प्रत्येक गोष्टींचा आधी संकेत मिळत असतो यावर आता माझा विश्वास बसायला लागला आहे. मग ती घटना चांगली असो किंवा वाईट. फक्त फरक एवढा असतो की घडलेला संकेत हा संकेत होता याची कल्पना संकेतच्या वेळी येत नाही. म्हणजे मी मुंबईला येण्याआगोदर मी एका कंपनीत संगणकावर काम करीत बसलो आहे. आणि कोणी तरी व्यक्ती माझ्या मागून काम झाले का अस विचारते. आणि मी रागात त्याला ‘काम झाल की सांगतो’ अस म्हणतो. अस एक स्वप्न पडले होते.

ज्यावेळी पडले त्यावेळी काही अंदाजच नाही आला. जवळपास सहा महिन्यांनी मी मुंबईला नोकरीच्या निमित्ताने आलो. बॉसला पाहिल्यावर, चेहरा ओळखीचा वाटला. पण कुठे पहिला हे लक्षात आल नाही. काही महिन्यांनी असच एक काम मी करत होतो. आणि तो सकाळपासून ‘काम झाल का?’ म्हणून मागे लागला. दर दहा-वीस मिनिटांनी विचारायचा. त्याला बर्याच वेळा मी ‘आज त्या कामाला अख्खा दिवस त्याला लागेल’ अस सांगत होतो. पण तो राहून राहून तोच प्रश्न. शेवटी संध्याकाळी इतका वैताग आला की रागात त्याला मी ‘काम झाल की सांगतो’ अस म्हणालो. अस म्हणाल्यावर तो शांत झाला. मग कुठे तरी हा प्रसंग बघितला अस वाटायला लागल. विचार केल्यावर ते स्वप्न आठवलं. आता रोजची पडणारी स्वप्न उठल्यावर लक्षात राहतात अस नाही. पण काही काही आठवतात.

मुंबईलाच असतांना एका फ्रेंच दाढीच्या व्यक्तीने ‘बाईक आहे का?’ तर मी त्याला म्हणालो की ‘लोकल आहे की’. असा एवढाच प्रसंग स्वप्नात पडला. आणि जवळपास आठ एक महिन्यांनी मी माझ्या मागील कंपनीच्या इंटरव्यूच्या वेळी माझ्या बॉस ने तोच प्रश्न विचारला. आणि मीही स्वप्नात दिलेलं उत्तर दिले. इंटरव्यू झाल्यानंतर तो व्यक्ती कोण ते कळलं. असो, अशी अनेक स्वप्न पडतात. पण ज्यावेळी पडतात त्यावेळी तो ‘संकेत’ आहे हे कळत नाही. गोष्ट घडल्यावर समजते. मुंबईहून पुण्याला आल्यावर ‘ती’ ने तिच्या आवडत्या मुलाशी लग्न केले अस तिची लहान बहिण मला सांगत होती अस एक स्वप्न, ती गोष्ट घडण्याच्या दीड वर्ष आधी पडल होते. त्यानंतर दोन तीन दिवस जाम टेन्शन आले होते. पण ज्यावेळी तिची लहान बहिण तीच गोष्ट, अगदी स्वप्नातल्याप्रमाणे सांगत होती त्यावेळी मात्र बातमीपेक्षा जास्त स्वप्न पडलंच कस यावर विचार येत होता.

आजकाल माझी कधी डावी, तर कधी उजवी डोळ्याची पापणी फडफडते. पहिल्या स्थळाच्या वेळी उजवी डोळ्याची पापणी खूप वेळा फडफडत होती. वडील म्हणतात की, पुरुषांची उजवी आणि स्त्रियांची डावी बाजूच्या पापणी, भुवयी, डोळा फडफडणे शुभ असते. दुसर्या स्थळाच्या वेळी माझी डावी पापणी खूप फडफडत होती. तिच्याशी बोललो तर तिला लग्नच करायचे नव्हते. माझाही नकार समजल्यावर तिचा चेहरा खुलला. आणि पापणी फडफडायचे बंद झाले. पण आता पुन्हा डावी तर कधी उजवी फडफडते आहे. काहीच समजत नाही आहे. एकदा माझ्या आत्याला माझ्या आजीची अंतयात्रेचे स्वप्न पडले होते. आणि जेव्हा पडले त्याच रात्री माझी आजी गेलेली होती. असो, हे संकेत सगळ्यांनाच येतात. आता ही काही अंधश्रद्धा, किंवा बुवाबाजी नाही. पण ज्या गोष्टी घडतात त्याचा संकेत नक्की मिळतो. संकेत ओळखणे तेवढे अवघड असते. सगळी स्वप्न म्हणजे संकेत अस नाही. आणि फडफडणे देखील संकेत नाही. पण कधी कधी स्वप्न आणि फडफडणे संकेत असू शकतात, असा तर्क मागील काही घटनांवरून लावला तर चूक नाही असे वाटते.


प्रतिक्रिया व्यक्त करा

आपला ई-मेल अड्रेस प्रकाशित केला जाणार नाही.