संघर्ष


संघर्ष हा जीवनाचा भाग आहे! अगदी इतका की प्रत्येक सेकंदाला आपण श्वास घेतांना देखील जीवन दोलायमान असते. मग कशासाठी संघर्षांला घाबरायचे? प्रत्येक जीव आपल्या जीवनात आपल्या क्षमतेनुसार संघर्षच करीत असतो. जन्मल्यापासून ते मरेपर्यंत तो चालतो.

ह्या संघर्षमय जीवनाची अनेकांना भीती वाटते. पण ते हे विसरून जातात की जीवनात संघर्ष हा अटळ आणि क्षणोक्षणी आहे! जन्माच्या आरंभापासून तो आहे. जो या संघर्षात टिकतो तोच प्रगती करतो. जेंव्हा शिक्षणानंतर मी नोकरीसाठी ह्या पुण्यनगरीत आलो त्यावेळी किमान पाच हजाराची नोकरी मिळावी अशी इच्छा होती. महिनाभर त्याच्या शोधात होतो. त्याही वेळी मनात अनेकदा असं वाटायचं की असं होऊ शकेल का? साधारण २००७च्या सुरवातीला पहिली नोकरी मिळाली पण पगार मात्र अडीच हजार रुपये.

संकटांना तोंड आणि धैर्य दाखवल्याशिवाय सर्वच अशक्य असतं. पुढे जाऊन व्यवसाय करावा असेही मनात आलेलं नव्हतं. नोकरीच्या नऊ वर्षांच्या अनुभवानंतर व्यवसायात उतरण्याचा निर्णय घेतला. ज्यावेळी नोकरी सोडली त्यावेळी साधारण लाखाच्या घरातील मासिक पगार होता. अनेकांना आजही तो निर्णय अयोग्यच वाटतो. पण आज तीन वर्षाच्या कार्यकाळात अनेक आर्थिक आणि मानसिक संकटांनी जे मी नऊ वर्षात शिकलो नाही ते शिकवले. जो अनुभव घेतला तो कदाचित नोकरी करतांना मिळणे अशक्यच होता.

आर्थिक अडचणी मनाची अन बुद्धीची परीक्षा घेतात. त्या पार करण्यासाठी धडपड करावीच लागते. त्यातूनच संघर्ष निर्माण होतो. अस्तित्व टिकवण्याचा संघर्ष! तोच आपल्याला खरं तर मार्गदर्शन करतो. चांगल्या वाईटाची पारख करायला शिकवतो. आव्हानांचा सामना करण्याचे धैर्य देतो. आणि जर तुम्ही यात यशस्वी झाला तर स्वप्नांहुन कितीतरी अधिक तो सत्यात आणतो. त्यामुळे संघर्ष शत्रू वा अडचण नसून ती संधी आहे. फरक केवळ बघण्याचा आहे. त्यात बदल केला तर ही चिंता आनंदात बदलते.

तुम्ही कोणत्याही क्षेत्रात असा. संघर्ष देखील असेल. त्याचे स्वरूप लहान अथवा मोठे असेल. परंतु त्याच्याशिवाय प्रगती नाही. त्याला टाळणे म्हणजेच प्रगती. ज्याला मनापासून प्रगती करायची असेल त्याने संघर्षाला कधीही पाठ दाखवू नये. काही काळासाठी आपण संकटात असल्याचे अनुभवालं. पण ती परिस्थिती क्षणिक असेल. जी भविष्याच्या अनेक गोष्टींचे कवाडे उघडेल. त्यामुळे संघर्षाला कधी टाळू नका!


प्रतिक्रिया व्यक्त करा

आपला ई-मेल अड्रेस प्रकाशित केला जाणार नाही.