संतांची भूमी


खरोखर आपला देश म्हणजे संतांची भूमी आहे. सर्व महात्मा आणि संत लोक इथे वास करीत होते. आणि अजूनही करतात. प्रत्येक ठिकाणी त्या महान संस्कारांचा अनुभव येतो. म्हणूनच की काय ओबामाला इथे यावेसे वाटले. मुळी हा देशच संतमय झालेला आहे. उगाचंच नाही, इतक्या यातना असून देखील देश इतका शांत आहे. काय काय वैशिष्ठ्ये वर्णने करावी या भूमीबद्दल. कुठेही जा, अगदी हिमालयात लडाखपासून ते कन्याकुमारीपर्यंत. लडाखमध्ये पाहिले तरी रस्ते असून नसल्याप्रमाणे. आणि कन्याकुमारीत देखील तीच परिस्थिती. आणि जिथे आहे, तिथे न चुकता एका किमीमध्ये दहा-बारा किमान अर्धा फुटांचे खड्डे असणार म्हणजे असणारच. कोण म्हणते देशात एकता नाही? आहे, रस्ते त्याचे प्रतिक आहे.

बर अनेक ठिकाणी रस्त्यांची कामे अर्धवट आहेत. मागील महिन्यातच एका तरुणाचा देहूरोडच्या पुलावर अशाच रस्त्याच्या अर्धवट कामामुळे अपघातात मृत्यू झाला. आतापर्यंत चार जण असे गेले आहेत. काय बोललो मी? ‘मृत्यू’? माझ चुकलच, स्वर्गात रंभा त्यांना जेवण भरवते आणि उर्वशी त्यांना अंगाई गीत गाऊन झोपी घालते अस ऐकायला आलाय. स्वर्गात नक्कीच सुखी असतील. त्यातील एकाचा पुढील महिन्यात साखरपुड्याचा कार्यक्रम ठरलेला. स्थळ पसंत करून निघालेला. देहूरोडच्या पुलावर ‘रंभा’ त्याची वाट पहात होती. किती छान ना! कोणीही त्या चुकीच्या कामाबद्दल साधा ‘ब्र’ देखील काढला नाही. साधी ‘हळहळ’, राग देखील नाही. नाही नाही! माझेच चुकले. संतांना ‘राग’ कुठे येतो? ते नेहमीप्रमाणे शांत.

खेडेगावात सर्व ‘खेडेकर’ संत लोकांना वीज अजून काही दिवसांनी पाहायला शहरात यावे लागेल. आणि शहरातील संत लोकांना ‘वीज आली आणि गेली’ हे त्या सीसॉ खेळाप्रमाणे झाले आहे. अर्धा तास येते आणि दोन तास गायब. पण ‘श्रद्धा आणि सबुरी’ ही शिकवण संत लोकात इतकी भिनली आहे ना! अरे, ‘अल्पसंतुष्टता’ हे संताचे लक्षण आहेच की. पाण्याबद्दल न बोलले तर बरे होईल. विना पाणी जीवन जगता येऊ शकते. हा सिद्धान्त मांडला नसतांना तो प्रत्यक्षात, नव्हे तर आपल्या कृतीतून या देशातील संतांनी दाखवून दिला आहे. ‘सयंम’ हाही एक संतांचा गुण. पहा ना! तो वेडा पाक गेल्या साठ वर्षापासून वेड्यासारखा हल्ले करून इथल्या संतांना ‘वैकुंठात’ पाठवतो आहे. पण त्याला काय माहित या देशाची ‘अभेद्य सयंम’ परंपरा. अजून साठ हजार वर्षे जरी हल्ले केले तरी इथे ‘जैसे थे’ राहाणार. कारण ही संतांची भूमी आहे. तो वेडा पाक ज्याला अजगर समजला आहे. ते मुळात ध्यानस्त बसलेलं एक गांडूळ आहे.

पहा ना, इथल्या भूमीची आणि इथल्या संतांची महानता, इतके प्रश्न असतांना ‘महापौर कोण?’ यावर चर्चा करतात. कसाब आणि गुरु सारखे इथल्या भूमीच्या छाताडावर बसून येथील संतांना ‘स्वर्गात’ पाठवले. आणि ते दोघे अजून इथेच! पण ‘क्षमाशील’ गुण हा अंगातच भिनलेला. अरे संतांचे ‘क्षमाशील’ हा देखील गुणच की. ‘गाई’ बद्दल काय बोलणार? तिच्यात तेहेत्तीस कोटी ‘देव’ असतात. त्यामुळे ‘महागाई’ इथल्या संत लोकांसाठी जणू ‘कामधेनू’च. म्हणून तर भगवान ‘संधी’ घरात पिढ्यानपिढ्या ‘अवतार’ घेत असतात. यावेळचा ‘राहू अवतार’ चालू आहे. प्रत्येक रुपात जन्म घेऊन ते, संत नाहीत अशा लोकांचा नाश करतात. त्यांच्या जन्माचा हाच एक उदयेश आहे. त्यांच्या ‘आदर्शवादी’ पक्षात तर काय बोलणार? त्यांच्यापेक्षा संत महान आहेत. आधी टू जी, पुढे राष्ट्रकुल, आणि आता तर आदर्शच निर्माण केलेला आहे. यावरून बोध किंवा किंवा बोधकथा असून देखील मतावर ‘निश्चल’ राहणे हा देखील एक संतांचा गुण आहे. या भूमीत, ‘धर्मादाय निधी’ उर्फ कर प्रणालीबद्दल काही बोलण्यात ‘अर्थ’ नाही. कारण त्यासाठी ‘अर्थ’ उरला तर पाहिजे. पण काहीही असो, मला या संतांच्या भूमीचा अभिमान आहे. कारण ‘कोणतीच गोष्ट अशक्य नाही’ हे वाक्य, या संतांच्या भूमीत प्रत्यक्षात आलेल आहे.


प्रतिक्रिया व्यक्त करा

आपला ई-मेल अड्रेस प्रकाशित केला जाणार नाही.