सकाळ


आमच्या पेपरवाल्याच्या कृपेने रोज ‘सकाळ’ उगवायला जरा उशीरच होतो. कंपनीच्या गडबडीमुळे मग ‘सकाळ’ चाळायला संध्याकाळ होते. आधीच कामाचा थकवा, आणि त्यात पहिल्या पानावर पहा नाहीतर पुरवणीत. जिकडे तिकडे ‘अ’ रे ‘अजितदादा’चा आणि ‘प’ रे ‘पवारांचा’. ते सोडलं तर बाकी वाचनयोग्य अस वर्तमानपत्र.

चार-साडेचार वर्षांपासून, म्हणजे तसं राज ठाकरेच भाषण पाहूनच.. मराठी धर्म म्हणून वर्तमापत्र घ्यायला सुरवात केली. अस नाही की इंग्लिश वर्तमानपत्र घेत नव्हतो. पण मराठी वर्तमानपत्र घेण्याचे सातत्य ठेवले. सामना, महाराष्ट्र टाईम्स, टाईम्स ऑफ इंडिया, डीएनए वगैरे. आणि गेल्या दोन एक वर्षांपासून सकाळ. ‘चिंटू’ नेहमीच करमणूक करतो. तसं सकाळ वृत्तसेवा आणि बिग ‘पी’ काही कमी मनोरंजन करत नाहीत. आता गेल्या रविवारच्या बातमीत, तेही पहिल्या पानावर, बिग ‘पी’ म्हणे “द्रमुक आणि तृणमूल काँग्रेसने पाठींबा काढल्यानंतर केंद्र सरकार लोकसभेत अल्पमतात. त्यामुळे लोकसभा निवडणूक केव्हाही जाहीर होवू शकते”. बातमी छापून दोन दिवस झाले नाहीत तर, बिग ‘पी’ पुन्हा “वेळेआधी लोकसभा निवडणूक होण्याची शक्यता नाही”. असे एक न अनेक बातम्या वाचून करमणूक होते.

‘इ सकाळ’ म्हणजे सकाळच्या वेबसाईटवर मी न चुकता जातो. बातम्यांसाठी नाही, त्याच्या खालच्या आलेल्या प्रतिक्रियांसाठी. पोट दुखेपर्यंत हसू येते. जाम मस्त असतात. बाकी ‘संपादकीय’ शंभर टक्के ‘राजकीय’ असल्याने ‘जमेत’ कधी धरतच नाही. बाकी एक गोष्टीसाठी मी सकाळला मानतो. आमच्या लाडोबाच्या (म्हणजे आमची कन्यारत्न) सकाळच्या कार्यक्रमाला ‘सकाळ’ची फार मदत होते. त्यामुळे सकाळचे आभार मानावे तेवढे कमी आहेत. एकूणच ‘सकाळ’ने जर आपला राजकीय विचारांचा ‘दुष्काळ’ संपवला तर नक्कीच अनेकांची ‘सकाळ’ खऱ्याखुऱ्या अर्थाने ‘सुकाळ’ होईल.


प्रतिक्रिया व्यक्त करा

आपला ई-मेल अड्रेस प्रकाशित केला जाणार नाही.