सख्खे


आज सख्ख्यांचा पोळा. आता मित्राला सखा म्हणतात. आणि त्या ‘सखा’चे अनेकवचनी ‘सख्खे’. खर तर मित्रांमुळे मला जगातील अनेक गोष्टींचे ज्ञान मिळाले. स्पष्टच बोलायचे झाले तर, ते माझे ‘गुरु’ आहेत. रात्रीच एकाचा शिंगातून एसएमएसचा फुगा आला. हा सख्खा म्हणजे परी वाहिनीचा ‘आशिक’. खर तर असे सख्खे खूप आधीपासून मिळत गेले. यातील पहिला सख्खा, मी संगणकाचा कोर्स करीत असतांना भेटलेला. नेहमी स्वतःहून चहा प्यायला जाऊयात म्हणून त्याचा आग्रह. बर, मी पण त्यावेळी वेडाच! लगेचंच. मग चहाच्या टपरीवर गेलो की, तो मला ‘दोन रुपये सुट्टे आहे का?’ अस विचारणार. मी बसने जा ये करायचो. त्यामुळे सुट्टे पैसे असायचे. आई वडिलांनी थोडे फार तरी खोटे बोलायला शिकवले असते तर किती बरे झाले असते. मी पैसे काढून द्यायचो. आणि त्याची तो एक सिगारेट खरेदी करायचा.

आता पाच वर्षांपूर्वी दोन रुपयात सिगारेट मिळायची. मग त्याची सिगारेट पेटवण्यापर्यंत चहा येणार. मग तो सिगारेट ओढणार आणि चहा पिणार. मी चहा पिणार आणि सोबत सिगरेटचा धूर खाणार. बर चहा पिऊन संपल्यावर. तो खिशात हात घालणार आणि मग पाकिटात बघणार आणि टपरीवाल्याकडे न बघताच टपरीवाल्याला शंभर सुट्टे आहेत का अस विचारणार. मग तो टपरीवालाही, ‘तीन रुपयांसाठी कशाला शंभराची नोट काढता. बघा ना सुट्टे असतील तर’. आणि ह्याच्याकडे एकच सुट्टा सापडणार. मग पुन्हा मीच लाजत काजत तीन रुपये सुट्टे काढून त्या टपरीवाल्याला देणार. आणि पुन्हा इन्स्टिट्यूटमध्ये जातांना बाजूच्या दुकानातून तो पन्नास पैश्यांच्या दोन ‘हॉल्स’ घेणार. त्यातली एक मला देणार आणि दुसरी तो खाणार. अस जवळपास महिनाभर चालल. त्यावेळी मी काही कमावता नव्हतो. त्यामुळे परवडेनासे झाले.

अजून एक सख्खा होता. तो माझ्याकडे येऊन त्याला क्लासमध्ये न समजलेल्या गोष्टी विचारायचा. आणि मी न आढेवेढे घेता त्याला सांगायचो. अस रोज चालायचे. मला कधीच काहीच शंका येत नसायची. आणि येण्यासारखे काहीच कारण नव्हते. पण एकदा असाच निघायला उशीर झाला. आणि सहज क्लासमध्ये काय चालले बघावे म्हणून डोकावले तर, तोच सख्खा पाच सहा पोरींना सकाळी मी शिकवलेले त्यांना जणू काही पंडित आहे, या आविर्भावात त्यांना शिकवत होता. मग काय दुसऱ्याच दिवशी पासून त्याला मी अर्धवट सांगायला सुरवात केली. मग काय त्याला त्याचाही आणि त्या पोरींना देखील त्यांचा प्रोजेक्ट बनवायला अडचणी  यायला लागल्या. मग आले निमुटपणे वटणीवर. मग मी त्यांचे प्रोजेक्ट बनवून द्यायचो. ज्याची किंमत काढली तर किमान वीस एक हजार होईल. त्यावेळी मी फुकट करून द्यायचो. आता आठवलं की हसू येत. अजून एक सख्खा होता. त्याला माझी एक मैत्रीण आवडली. मग काय प्रेमात तो, आणि त्याच्या सांगण्यावरून तिला पटवायचे काम मी करणार. आता तिला त्याच्यात काही इंटरेस्ट नव्हता त्याला मी काय करणार? नंतर नंतर अस होवू लागल की, त्याला माझ्या बद्दलच शंका येऊ लागली. आणि आमच्या दोघांचेच लफडे असल्याप्रमाणे त्याला वाटायला लागलं. आणि शेवटी त्याच्यासाठी मी तिच्याशी बोलण बंद करावं लागलं.

आत्ताच्या सख्याची तर गोष्टच निराळी आहे. उसने पैसे घेणार आणि नंतर विसरून जाणार. काही सख्ख्यांबद्दल तर काही विचारूच नका. माझे वजन खर्च करून त्यांना जॉबसाठी शिफारस केली. माझ्यासाठी अस कोणीच नाही केलेलं. पण हे सख्खे, त्या जॉबसाठी फिरकलेच नाहीत. परवाचेच उदाहरण घ्या. दुपारी जेवतांना एका सख्याला साधा चमचा आणतोस का अस विचारलं तर तो माझ्यावरच भडकला. आणि मी रोज त्यांचासाठी कधी भात, कधी पापड, कधी पोळ्या जेवतांना उठून आणून देतो. आणि हा त्याचे जेवण होऊन देखील असा. एक तर असला भारी सखा आहे. आत्तापर्यंत कधीच चुकूनही फोन करत नव्हता. पण एक काम अडल. झाला लगेचंच फोन सुरु. मग काम करतो म्हणालो तर फ्रेंडशिपचे एसएमएस पाठवायला लागला.

गावातील एक सख्याची गोष्ट तर अजूनही निराळी. कधी गावात ओळख दाखवत नव्ह्ता. आणि आता जॉब हवा आहे, म्हणून फोन केला. बर त्याला मदत करण्याचा वायदा केला. तर तो सख्खा ‘मी तुझ्याकडे राहायला येतो. मला तू सॉफ्टवेअर शिकव. आणि माझ्यासाठी जॉबही तूच बघ. आणि तिथे मला वशिला लावून चिटकव’ अस म्हणून मागे लागला. सोडा, हे सख्खे पुराण खूप मोठे आहे. बोलायचे ठरले तर एखादा ‘सखवतद्गीता’ तयार होईल. पण काय चुकीचे, हे शिकायला खूप काही मिळाले. हे असल्यामुळे शत्रूची कधी गरजच भासली नाही. असो, आज पोळ्याला बैलांना चाबकाने मारत नसतात. अरे सख्खी बद्दल तर सांगायचे राहूनच गेले. काल तीच्या कामासाठी तीच्या घरी गेलो होतो. तर ती अर्धा तास फोनवरच. शेवटी मीच वैतागून निघून आलो.

मी नेहमी अस काही घडलं की, का घडलं याचा विचार करतो. आणि आता मला पक्क ध्यानात आले आहे. की चूक सख्ख्यामध्ये नसून माझ्यातच आहे. मी खूप लवकर कोणावर विश्वास टाकतो. आणि त्यांच्यासाठी काहीही करायला तयार होतो. त्यामुळे हे सगळ घडतं. मैत्री तराजू प्रमाणे आहे. दोन्ही बाजूने सारखीच भावना असेल तर ते टिकते. नाहीतर.. सोडा, या ‘सख्ख्या डे’ ला काही नको बोलायला.


प्रतिक्रिया व्यक्त करा

आपला ई-मेल अड्रेस प्रकाशित केला जाणार नाही.