सगोत्र


नेहमीप्रमाणे या रविवारी वडिलांनी एक स्थळ पाहायला जायचे अस सांगितले होते. पण यावेळी वडिलांनी मला, मुलीला जे काही विचारायचे ते सर्वांसमोर विचारायाचे अस आदेश वजा सल्ला दिला होता. त्यांच्यासमोर काय बोलणार? मी नुसतीच मान डोलावली. आईला समजावून पाहिलं. पण काय फायदा झाला नाही. शनिवारी मित्राला भेटून रात्री घरी आलो तर वडील कोणाशी तरी फोनवर बोलत होते. आईने सांगितले की उद्या स्थळ पाहायला जायचे रद्द झाले आहे. ‘का?’ विचारल्यावर आपले आणि त्यांचे एकचं गोत्र आहे, अस उत्तर मिळाले. मनातल्या मनात देवाला लाख लाख धन्यवाद दिले.

मग काय, रविवारी वडील पुन्हा गावी रवाना झाले. काल कंपनीत आल्यावर कॅन्टीनमध्ये मित्रांसोबत गप्पा मारतांना सहजच हा विषय निघाला. त्यांना मी माझ आणि मुलीचे गोत्र एकचं असल्याने वडिलांनी ते स्थळ टाळले अस सांगितल्यावर लगेचच ‘सपाट महाचर्चा’ सुरु झाली. त्यातील माझा एक मित्र सुद्धा माझ्याच प्रमाणे कांदेपोहेच्या प्लेटा संपवतो आहे. त्याने ‘बरोबर आहे’ अस म्हणून वादाचा नारळ फोडला. लगेच दुसऱ्या मित्राने माझ्याकडे बघून ‘सगोत्र आहे म्हणून काय झाले?’. मी नुसतंच ‘काही नाही’ म्हणालो. मग दोन एक मिनिटे शांतता पसरली. मग पहिला मित्र माझ्या दुसऱ्या मित्राला म्हणाला की ‘सगोत्र असले की बहिण भावाचे नाते असते’. ते ऐकून दुसरा मित्र पहिल्या मित्राला म्हणाला की ‘तुमच्यात  मामाच्या मुलीशी लग्न केलेले चालते का?’ तर पहिला मित्र ‘हो’ म्हणाला. मग पुन्हा दुसरा मित्र पहिल्याला म्हणाला ‘मग मामाची मुलगी बहिण लागत नाही का तुझी?’. अस म्हणाल्यावर पहिला एकदमच शांत झाला. मला हसू आवरतच नव्हते.

दुपारी असचं माझ्या मैत्रिणी सोबत गप्पा मारत होतो. ती फारचं नाराज होती. माझ्या मागील कंपनीत ती आणि मी सोबत असतांना खूप धमाल यायची. पण आता मी या कंपनीत आणि ती जुन्या. त्यात तिकडे खूप ‘ग्रुपनीझम’ चालू आहे. त्यामुळे ती वैतागली होती. तिचा मूड बदलण्यासाठी मी माझ्या लग्नाचा विषय काढला. झालेला सगळं किस्सा तिला सांगितला. तर तिला ‘सगोत्र’ म्हणजे काय? हेच माहित नव्हते मग तिला सगळंच सांगत बसावं लागल. तिला म्हणालो शास्त्रानुसार ‘सप्तऋषी’ पासून मानव समाज वाढला. प्रत्येकाचे एक अशी सात गोत्रे निर्माण झाली. प्रत्येकाने आपला वंश वाढवला त्यामुळे त्या वंशातील प्रत्येक जण एकमेकांचे नात्यातले आणि एकाचं कुळातील. म्हणून घरात भाऊ बहिणीचे विवाह घडू नये. यासाठी पडलेली प्रथा.

सगळे ऐकल्यावर ती म्हणाली, ‘माझ्या लहान भावाचे आणि एका मुलीचे प्रेम आहे. आणि दोघांचेही गोत्र एकचं आहे. तरीही आम्ही लग्नाला होकार दिला.’ मी म्हणालो ‘अस काही नाही प्रत्येक गोष्ट आपल्या मानण्यावर असते.’ असो, मग तिचे मन शांत झाले. आणि माझ्यामुळे निर्माण होणारे संकट टळले. नाहीतर उगाच ‘मियाँ आणि बीबी राजी’ आणि हे नवीनच बीबीसी सुरु झाले असते. तिला जास्त सल्ले देण्याचे टाळले. मग ते ‘दुसर्याला सांगे ब्रम्हज्ञान आणि स्वतः कोरडे पाषण’ सारखे झाले असते. बापरे, काल परवा पर्यंत टीव्हीवरील सगोत्र माझ्या घरात. असो, पण यावेळी सगोत्राने वाचवले बुवा. मला लग्नाची इच्छा नाही अस नाही. मी तर चोवीस तास मुलींचाच विचार करतो. पण काय करणार कधी कधी या मुलींची खूप भीती वाटते, तर कधी खूप इच्छा होते.


प्रतिक्रिया व्यक्त करा

आपला ई-मेल अड्रेस प्रकाशित केला जाणार नाही.