साठी


काल परवाच आपल्या देशातील सरदारांची नव्हे तर आपल्या देशाच्या एकमेव लोकसभेची ‘साठी’ साठा उत्तरे ‘सं’पूर्ण झाली. पाच एकशे सरदार लोकसभेत आणि काही ‘तिहारातून’ या ‘सुवर्ण’क्षण अनुभवला. ठरल्याप्रमाणे लोकशाहीचा आणि पर्यायाने लोकसभेचा उदो उदो केला. आमच्या विशेष प्रतिनिधीकडून मिळालेल्या माहिती नुसार अनेक सरदारांनी गेल्या ‘साठ’ वर्षात देशात कशी ‘साठमारी’ केली याचे यथोचित आणि सुखासुखे वर्णन केले.

देशाच्या विकासात(?) लोकसभेचा आणि सरदारांचा कसा ‘हातभार’ लागलाय. आणि देशाची कशी प्रगती(आणि इथेसुद्धा प्रश्नचिन्ह) या सरदारांनी घडवून आणले याचा पाढा वाचला. राष्ट्रपतीताई पाटील बाईनी समस्त पृथ्वी प्रदक्षिणा घालून ‘मेरा भारत महान’ आणि त्या देशाची ‘लोकशाही’ त्याहून महान याचे गुणगान गायले. बाकी ‘साठी’ गाठल्यानंतर फोटोसेशन वगैरे. एकूणच, याप्रसंगी ‘राजा’ची उणीव मात्र जाणवली. तसे ते दिव्य व्यक्तिमत्व काल प्रकटलं म्हणा.

असो, अशा ‘सेलिब्रेशनला’ सेलेब्रिटी नको? एक लक्ष पंच्याहत्तर हजार वगैरे कोटींचा घोटाळा करणारा ‘सेलेब्रिटी’च असतो ना! काहीही होवो, सरदारांच्या चेहऱ्यावर आनंद पसरलेला. काय करणार ‘व्यंगचित्र’चा जागरण गोंधळ घालून साठा उत्तरे ‘अकलेची दिवाळी’ साजरी केल्यानंतर ‘श्रमपरिहार’ नको? ..वयाचा परिणाम. ‘साठी बुद्धी नाठी’ उगाचचं नाही म्हणत. बाकी, अशा रीतीने ‘साठी’उत्सव उत्साहात साजरा झाला. बाकी महागाई, दुष्काळ, पाणीटंचाई, कसाब-गुरु फाशी असल्या फडतूस विषयांवर चर्चा करायला कुणाला सवड?


प्रतिक्रिया व्यक्त करा

आपला ई-मेल अड्रेस प्रकाशित केला जाणार नाही.