सार्वजनिक गणेशोत्सव कशासाठी?


गेले काही दिवस हा प्रश्न राहून राहून मनात येतोय. आपण एखादी गोष्ट करतो. का? अस विचारल्यावर काहीतरी उत्तर नक्कीच असतं. म्हणजे, सकाळी उठल्यावर दात घासतो. का दात घासतो? अस विचारल्यावर, उत्तर पटकन येईल की, दात स्वच्छ राहावेत म्हणून. कंपनीत जाऊन काम कशाला करतो? उत्तर येईल पैसे कमावण्यासाठी. अशा एक न अनेक गोष्टी करतांना, त्यामागे कारण असते. पण आपण गणेशोत्सव सार्वजनिकरीत्या का करतो? अस विचारल्यावर अस कुठलंच उत्तर मनात पटकन येत नाही.

म्हणजे घरात गणपतीची प्रतिष्ठापणा वगैरे, त्याला छानपैकी आरास, सजावट. मग तो विषयच बदलून जातो. मी त्या हजारातील एखाद दुसऱ्या मंडळांबद्दल नाही बोलत. जे समाजकार्य करतात. पण दिवसभर आपला साऊंड सिस्टीम कुटायचं. लाईट फुकट. जागा फुकट. आता लोकांकडून वर्गणी गोळा करून हे अस केल्यावर. फुकटच म्हणायचं ना. म्हणजे मला एक गोष्ट कळेनासी झाली आहे. काही दिवसांपूर्वी उत्तराखंडात जे घडलं. त्यानंतर, दोन-चार डझन बलात्कार झाले. मी म्हणत नाही, तुम्ही तिथे जाऊन काहीतरी करा. पण थोडंस विचार.

सकाळ असो, संध्याकाळ असो. बर, वाजणारी गाण्याचा स्वर अगदी कान फाटेल एवढा. आणि ते आजकाल मिसरूड सुद्धा न फुटलेल्या. साउथच्या एखाद्या टपोरी सारख्या दिसणाऱ्या नायकाप्रमाणे पोझ देत. ह्यांचे भले मोठे फ्लेक्स. काय तर, सर्व गणेशभक्तांचे हार्दिक स्वागत. वाजणाऱ्या गाण्याचा आणि गणपतीचे काय कनेक्शन हा संशोधनाचा विषय होईल. असो, जास्तच त्रागा होतोय माझा. मला फक्त एवढंच म्हणायचं होत की, पारतंत्र्यात ही सार्वजनिक गणेशोत्सवाची कल्पना उल्लेखनीय होती. आजकाल, त्याची कितपत गरज आहे? मुळात केलंच पाहिजे अस काय आहे? असे प्रश्न मन गोंधळून टाकतात. करून जेवढा फायदा होतो आहे. त्याहून न केल्याने अधिक फायदा होईल असे मला वाटते.

शेवटी हा विषय, ज्या चष्म्यातून पाहू तसा आहे. मागील महिन्यात एका लहान मुलांच्या अनाथ आश्रमात गेलेलो. तिथल्या त्या लहान. सर्वात वयाने मोठी मुलगी दोन वर्षाच्या आसपासची असेल. त्या कोवळ्या निरागस मुलींना पहिल्यापासून, यार असले विचार फार मनात डोकावायला लागले आहेत. अगदी, नास्तिकतेकडे गाडी वळू लागली आहे. धर्म काय सांगतो? आणि आपण काय करतो? देव कशात आहे? दगडात की माणसात? ह्या असल्या विचारांनी फार हैराण केले आहे. म्हणून मग यावेळी वर्गणी न देता त्या पैश्यांचे लहान मुलांसाठी मी साबण, तेल, पावडर वगैरे आंघोळीचे साहित्य दिलेले. असो, बास करतो. नाहीतर गाडी हळूहळू गणेशोत्सवावरून घसरून सगळ्याच सार्वजनिक उत्सवांवर घसरेल.


प्रतिक्रिया व्यक्त करा

आपला ई-मेल अड्रेस प्रकाशित केला जाणार नाही.