सिंहाच्या बछड्यांची गोष्ट


एक गोष्ट! कोणे एके काळी भरत खंडात गुजराच्या सिंहाचे राज्य होते! त्याचे अनेक बछडे होते. प्रत्येक बछड्याचे सिंहावर फार प्रेम. त्याची डरकाळी भरतखंडाला हादरे देत असे. बाकीचे प्राणी विशेषतः वाघ, हत्तीनां त्याचा विशेष राग होता. सुरवातीला सगळं ठीक चाललेलं. पण पुढे जाऊन सिंह मनात आलेल्या गोष्टी सर्वांना अंमलात आणावयास लावी. कधी नोटाबंदी तर कधी प्राणी गणना!

दिवसभर पोटापाण्याचा उद्योग सोडून भलत्याच गोष्टी करायला लावल्याने प्रत्येकजण ह्या ना त्या कारणाने वैतागला होता. पण बछडे मात्र आनंदून जायचे. रोज काहीतरी चाललेलं असायचं. काही प्राण्यांनी सिंहाच्या विरोधात बंड करण्याची अयशस्वी प्रयत्न केला. बछड्यांना जंगलातील इतर प्राण्यांच्या वागणुकीमुळे भयंकर राग यायचा. आमचा सिंहराजा रोज भल्या पहाटे उठून कधी टेकडीवर तर कधी घनदाट जंगलात डरकाळ्या फोडतो. तरीही ह्या मूर्ख प्राण्यांना त्याची जाणीव नाही असे त्यांना वाटे.

मग कधीकधी ह्याच कारणाने इतर प्राण्यांशी त्यांची बाचाबाची तर कधी झटापटी देखील होई! बिचार्या बछड्यांचा पार मनस्ताप होई. सिंहाच्या गोष्टीमुळे काय तो विरंगुळा होई! सिंहाने एखादी डरकाळी फोडली की बछडेगणांमध्ये आनंदाचे वातावरण तयार होई! तोच जगातील सर्वशक्तिमान प्राणी असा समज त्यांनी करून घेतला होता. जंगलातील प्राणी का चिडतात याच गणित मात्र त्यांना कधी उमगलं नाही!


प्रतिक्रिया व्यक्त करा

आपला ई-मेल अड्रेस प्रकाशित केला जाणार नाही.