सोन्याचे दिवस


रोज येणारा दिवस म्हणजे मोत्याच्या माळेतील एक मोती. पण! हे मोती आता संपत आले आहेत. दोनच महिने पुरतील इतकेच मोती उरले आहेत. काल त्याचा छोटासा अनुभव आला. काय बोलू तिच्याबद्दल? देव दर्शनाला जातांना देवाच्या चरणातील चाफ्याचे फुल, ज्याच्या सुगंधाने वातावरण प्रफुल्लित होते. तिचे बोलणे, तिचे पहाणे. तिचे रूप, ती जशी सोन्याच्या भांड्यात रेशमी वस्त्रात ठेवलेला हिरा, आणि तिची कांती म्हणजे हिऱ्यावर पडलेलं सूर्याची किरणे. त्या झगमगाटात दिवस न्हाऊन निघाला. ते दोन बोलके नेत्र, अस वाटत ते क्षणात बोलायला लागतील. ते ओठ, तिचे हसणे, चालणे, तिची केशरचना. सगळ् पाहून मन क्षणा क्षणाला रोमांचित होते.

गेल्या तीन महिन्यापासून या मोत्यांच्या पावसात मन अगदी चिंबचिंब भिजलेल आहे. तीच्या नुसत्या असण्याने वातावरण बदलून गेलेले आहे. सगळेच छान आणि सुगंधी! पण एक सतत बैचेन करणारी तिची ओढ. तिचे वेड लावणारे सौंदर्य आणि त्याने सतत वाढणारे विचारचक्र. चंद्राची कोर जस जशी वाढते, तसे तीच रोज अधिकाधिक खुलणारे सौंदर्य. हे सगळे स्वप्न की माझे भाग्य! या अखंडित सौंदर्याच्या गंगोत्रीची भेट, अजून काय हवं जगायला? तीचा नेत्रकटाक्ष जणू हजारो तीक्ष्ण शस्त्रांनी केलेल्या जखमा. जगण्याचा खरा आनंद यापेक्षा अजून काय वेगळा असतो? एक नशा, एक धुंदी! काय वर्णन करावे. अमृताचे सुख. तिचे बोल, जणू हृदयाच्या छेडलेल्या तारा. ती समोरून जातांना.. अंतरंगात वाजणारे मंजुळ संगीत. सगळ् स्वप्नवतच!

इतक्या सुंदर आणि गोड सोबती सोबत आयुष्याचा प्रवास, आहाहा! विचारच मन रोमांचित करून टाकतात. एक गोड आणि सुंदर जादू. ज्या जादूने सुरेल आयुष्याची पहाट दाखवली. एक मस्ती ज्यात धुंद होवून नाचाव. तिची येणारी आठवण, आणि त्याने मनात होणारा गोंधळ. ती नसतांना ती असल्याचा होणारा भास. सेकंदात निर्माण होणाऱ्या हजारो वेदना. आणि ती असल्यावर धो धो कोसळणारा आनंदाचा झरा. काय खरे आणि काय खोटे? ती सोडून बाकी सगळे निरर्थक. ती एक ‘सोनेरी पहाट’. तीच्यात दिसणारी आयुष्याची सुगंधी सकाळ. बस फक्त दुख हे आहे की, ‘काळ’ संपत आला आहे. आणि ‘भविष्य’ फारच गोंधळून टाकणारे आहे. आणि वर्तमान दोलायमान. कधी ‘हो’ तर कधी ‘नाही’. पण गेलेले तीन महिने म्हणजे स्वप्नंच! सत्य इतके सुंदर असूच शकत नाही.

खरोखर प्रत्येक सोन्याचा दिवस. तीच्याविना जगणे म्हणजे गोडी नसलेली मिठाई. स्वातंत्र्य नसलेला स्वर्ग. हे सोन्याचे दिवस आयुष्यभर जपून ठेवील. तीन महिन्यांपूर्वी याच दोन तारखेला मी तिच्याशी पहिल्यांदा बोललेलो. आठवणी, उत्साह, अपेक्षा, स्वप्न सगळे सगळे अगदी रोमांचित करणारे. पुढचा महिन्यात ह्या सगळया गोष्टी संपणार! मी सांगून टाकील तिला. देवाकडे एक प्रार्थना आहे. माझ्या वागण्याने ती नाराज नको होवू देवू. ती अशीच आनंदी, उत्साही रहावी. नाहीतर, मीच माझ्या सोन्याच्या दिवसाच्या सोनेरी स्वप्नाला झालेल्या वेदना, आयुष्यभर टोचत राहतील.


प्रतिक्रिया व्यक्त करा

आपला ई-मेल अड्रेस प्रकाशित केला जाणार नाही.