सौंदर्याची देवी


काय सांगू आजचा दिवस कसा गेला ते!!! आज अप्सरा काय दिसत होती. ती इतकी छान आहे ना! आज माझ्याकडे शब्दच नाहीत काही बोलायला. एकतर ती इतकी गोरी गोरी पान, फुलासारखी छान.. आणि आज तीचा तो गुलाबी रंगाचा ड्रेस. तिला पाहून आज दिवसभर मला तिच्याशी काहीच बोलता नाही आले. खरंच ती इतकी सुंदर दिसत होती ना! आणि दुसरी गोष्ट म्हणजे मी आज खूप, खूप डब्बा. नाही खरंच, काल कुठून बुद्धी सुचली आणि केस कापायला गेलो अस झालं. आता मी म्हणजे ‘टकलू हैवान’. त्यात कालही गाढवपणा घडला. काल ती दुपारी माझ्याकडे बघून हसत जात होती. आणि मी तिला पाहून न पाहिल्याप्रमाणे केले. तिचे ते गोड हास्य! काय सांगू किती छान दिसत होती. आणि मी मुलीसारखा लाजून खाली मान घातली. आणि तीच्या मैत्रिणीकडे पहिले. यार, ती माझ्याकडे पाहते त्यावेळी माझी परिस्थिती हृदयविकाराच्या झटका येऊन शेवटचे काही सेकंद मोजत असलेल्या माणसाप्रमाणे होते. त्या क्षणाला मला काहीच सुचत नाही. आणि मग मी असल्या ‘गाढवचुका’ करतो. नंतर रात्रभर अप्सराने काय विचार केला असेल या विचाराने डोके खाल्ले.

आणि आज ती आली त्यावेळी, आहाहा! अजूनही ती डोळ्यासमोरून जातच नाही आहे. ते तिचे काळेभोर केस. किती निर्मल! किती छान. अगदी माधुरी दीक्षितची आठवण यावी अगदी तसे. आणि माझे आज ‘छोटेसे नन्हेसे..’ कोल्हापूरचे पहिलवान लोकांचे पण जास्त असतील माझ्यापेक्षा. कशाला काल केस कापायला गेलो? असो, एकतर ती इतकी गोरी आहे ना! त्यात तो गुलाबी ड्रेस. आणि तिचे ते गुलाबी ओठ. आहाहा! पाहून घसा.. नको. यावर नको बोलायला. अगदी मेनका/उर्वशी जणू. त्याही फिक्या! तिचे डोळे पाहून त्यातच बुडून जाव. त्यात तीच्या पापण्यांची हालचाल. इतकी इतकी छान दिसत होती ती आज. पण मी आज, खूप भंगार दिसत होतो. म्हणून तिच्याशी कसं बोलू अस झाले होते. मला पाहून तीला काय वाटेल अस मनात येत होते. आणि मी त्या वॉशरूम मध्ये तोंड धुवून निघणार तेवढ्यात, मला बहिणीचा फोन आला. मग काय, तसाच फोनवर बोलत गेलो. आणि नुसतंच तिला हात हलवून ‘हाय’ केले. तीचा तो नेत्रकटाक्ष खुपंच जालीम होता. इतकी छान जगात कोणी असू शकते यावर माझा अजूनही विश्वास बसत नाही आहे.

दुपारी कॅन्टीनमध्ये गेलो. माझे मित्र आधीच स्थानापन्न झालेले. मी जाऊन चक्कर मारली कॅन्टीनमधील जेवणाकडे. तर पाहून जेवू का नको अस ते जेवण. तशी भूक होती पोटात. मग म्हटले, मित्रांनी काय आणलय पाहू. मित्रांजवळ जवळ जातांना अलीकडच्या ‘रो’ मध्ये मला तिची मैत्रीण जेवण करतांना दिसली. सोबत ‘वानरसेना’ होतीच. मग मनात, ती देखील असेल असे विचार घोळू लागले. पण मी इकडे तिकडे न बघता सरळ मित्रांजवळ गेलो. त्यांच्या भाज्या चांगल्या होत्या. मग म्हटले जेवू. त्यांना हात धुवून येतो अस म्हटले. येतांना ‘चमचे’ घेऊन ये अस त्यांनी सांगितले. हात धुवून चमचे आणले. येतांना नजरेचे भिरभिर चालूच. मग काय पुढच्याच सेकंदाला त्याच रांगेत दिसली. किती गोड हसत होती. मग काय, मन ठिकाणावर राहीच ना! आणि श्वास, यार या श्वासाचे काय लफडे आहे काही कळत नाही. ती समोर आली की किंवा दिसली की हजार किमी पळून आल्यावर जसा होईल तसा होतो. त्यामुळे हृदयाचे ठोके चुकू लागतात. ती आणि मी एकमेकांकडे पाठ करून बसलेलो. मग काय गेली भूक. किती मस्ती करते ती! तो एक ‘मावश्या’. म्हणजे तो एक मुलगा आहे. अगदी सुरवातीला, म्हणजे मी अप्सराकडे पहायचो, आणि हा माझ्याकडे. म्हणून मग त्याला मी ‘मावश्या’ अस बारसे करून टाकले. त्या मावशाला तिने आग्रह करून एक लाडू खाऊ घातला. आता मी नाही पहिले. पण माझ्यासमोर बसलेले माझे मित्र उर्फ ‘आखों देखा’ हाल सांगणारे कॉमेंट्रीटर होते.

मी तीच्या पाठीच्या बाजूने असल्याने फक्त त्या गोंधळात तीचा तो गोड आवाज ऐकू येत होता. मला तिला पहायची खूप इच्छा होत होती. पण सगळ फूस. हिम्मतच नव्हती होत. दुपारी मित्रासोबत कंपनीच्या बाहेर असलेल्या गवतात गप्पा मारत बसलो. काम करायची इच्छाच होत नव्हती. पुन्हा डेस्कवर आलो तर, ती डेस्कवर नव्हती. खूप वेळ वाट पहिली. शेवटी निघालो. तीचा खूप राग आला होता. काल देखील तिने असेच केले. माझे मित्र खाली कॅन्टीन मध्ये चालले होते. मलाही बोलावले. ते गेल्यावर देखील मी तीच्या येण्याची वाट पहात बसलो. पण ती आलीच नाही. खाली कॅन्टीनमध्ये गेलो तर त्या वानरसेने सोबत बाई साहेब. पण तेव्हा देखील हिम्मत झाली नाही. पाच एक मिनिटे मित्रांसोबत बसलो. आणि तिथून सटकलो. असो, उद्या नक्की बोलेल. अगदी मनसोक्त बोलेल.

आणि हो सकाळी थोडा उदास झालो होतो. पण खूप छान वाटले तुमच्या प्रतिक्रिया पाहून! धन्यवाद! आता ही रात्र कधी जाते अस झालं आहे. उद्या पुन्हा आला तो शुक्रवार! असं विरह का लवकर येतात?


प्रतिक्रिया व्यक्त करा

आपला ई-मेल अड्रेस प्रकाशित केला जाणार नाही.