स्वच्छता


स्वच्छता ही सरकारची जबाबदारी नाही. हो हे मीच म्हणतो आहे. आपण सदैव स्वच्छतेवरून सरकारला झापतो. पण कचरा नेमकं करतंय कोण? याचा विचार केलाय.

काल बसने मुंबईहून पुण्याला येतांना, शेजारील सीटवरील महाशयांनी शेंगाच्या टरफले जागेवर टाकून कचरा केला. बर, चांगले सुशिक्षित व्यक्तिमत्व. झापल्यावर महाशय म्हणतात की, बाहेर फेकण्यापेक्षा इथं केलेला चांगला नाही का?

माझ्या सोसायटीच्या एका बाजूच्या सुरक्षा भितींच्या पलीकडे बराच कचरा आहे. इमारतीमधील व बाजूच्या लोकांनी केलेला. दोन दिवसापूर्वी, माझी सहा वर्षाची जेष्ठ कन्या म्हणालेली, ‘इमारत होण्यापूर्वी आपण आलेलो. तेंव्हा तिथे कचरा नव्हता. मग आता तो कुठून आला?’

माझ्या रोजच्या ये जाण्याच्या रस्त्यात एका ओढा आहे. त्या ओढ्यात रोज रात्री सामूहिक कचरा फेकण्याचा दैनंदिन कार्यक्रम आजूबाजूचे लोक न चुकता पाळतात.

यातून काय बोध घ्यावा. शिक्षण केवळ गुण मिळवण्यासाठी नक्कीच नसते. हेच आम्ही विसरलो आहोत. आमचे सार्वजनिक स्थळे, स्वच्छतागृहे अस्वच्छ असतात. कोण करतात घाण? यातच उत्तर आहे.

आपण जोपर्यंत हे मान्य करत नाही की जनताच ही भूमीवर अस्वच्छता करते तोवर हा प्रश्न सुटणार नाही. आपल्याला सवयी बदलणे आवश्यक आहे. स्वच्छता व त्याचे महत्व आपल्या संस्कृतीने देखील सांगितलेले आहे.

स्वच्छता केवळ उत्साही वातावरणासाठीच नाही तर आरोग्यासाठी आवश्यक आहे. मग शालेय अभ्यासक्रमात समावेश करूनही लोक अस्वच्छता का करत असावीत?

शहरे देश एकट्या सरकारची नाहीत. त्यामुळे आधी आपण स्वतःला बंधने घालून घ्यावीत. प्रत्येकानेच काळजी घेतली तर अख्खा देश स्वच्छच राहील. ह्यात कोणतच रॉकेट सायन्स नाही.

जनता ही ह्या देशाची मालक आहे. मालकाने आपली मालमत्ता जपायला काय हरकत आहे? बाकी कालच्या महाशयांना झापल्यावर फुगून बसले. मग कोणी बोलावं असं वागावंच कशाला? प्रत्येक ठिकाणी स्वच्छता राखा म्हणून फलक असतात.

२०१८ मधील एका सर्वेक्षणानुसार स्वच्छतेत जगातील १८० देशांपैकी भारताचा १७७ क्रमांक लागतो. यावरून आपल्याला हा विषय किती गंभीरपणे घ्यायला हवा याची कल्पना येईल. त्याची यादी टाकतो आहे.

हा दुवा: https://epi.envirocenter.yale.edu/2018/report/category/hlt

जगातील सर्वाधिक स्वच्छ देश
जगातील सर्वाधिक स्वच्छ देश

मजेशीर गोष्ट अशी की पाकिस्तान, नेपाळ, भूतानसारखे देश हेही आपल्याहून अधिक स्वच्छ आहेत. आता हा सर्व्हेच नाकारायचा सोपा मार्ग आपल्याकडे उपलब्ध आहे. पण त्याने सध्याच्या परिस्थितीत कोणताच बदल होणार नाही. ठरवा मग कोणता मार्ग निवडायचा!


प्रतिक्रिया व्यक्त करा

आपला ई-मेल अड्रेस प्रकाशित केला जाणार नाही.