स्वप्न


पहाटे एक स्वप्न पडलं होत. ‘ती’च्या वडिलांनी तीच्या लहान बहिणीसाठी एक स्थळ पसंत केल. आणि तिचा सुद्धा याला होकार होता. यार असली स्वप्न पहाटे का पडतात? मी मुंबईला नोकरी जाण्याआधी एकदा एक स्वप्न पडलं होत की मी एका माझ्यापेक्षा वरच्या दर्जाच्या माणसावर रागावतो आहे. आणि ते स्वप्न सात महिन्यांनी खरं झाल होत. एकदा मुंबईच्या कंपनीतील माझा बॉस मला दर दहा मिनिटांनी काम किती झाल अस सारखं विचारात होता. आणि त्यावेळी मी त्याला रागाच्या भरात ‘झाल की सांगतो’ अस म्हटलं. सगळ स्वप्नात घडल्याप्रमाणे घडल. गोष्ट घडून गेल्यावर ही गोष्ट आधी कुठे तरी पाहिलेली अस वाटायला लागल. मग लक्षात आल की हे आधी मी स्वप्नात बघितलं होत.

‘ती’ ने तीच्या आवडत्या मुलासोबत लग्न केल हे तिची लहान बहिण मला सांगत आहे अस एकदा स्वप्न पडलं होत. आणि ते सत्यात जवळपास वर्षांनंतर आल. आणि ते स्वप्न पडलं आणि पुढे दोन-तीन दिवस झोपच आलेली नव्हती. तिची लहान बहिण ज्यावेळी हे सांगत होती त्यावेळी मी स्वप्नात आहे की काय असंच वाटत होत. मी मुंबईला असताना असंच एक स्वप्न पडलं की मला मुलाखतीत मुलाखत घेणारा ‘तुझ्याकडे बाईक आहे का?’ अस विचारलं. आणि मी त्याला ‘लोकल आहे ना’ अस उत्तर दिल होत. नंतर ज्यावेळी मी माझ्या जुन्या कंपनीच्या मुलाखतीसाठी आलो त्यावेळी अगदी तसचं म्हणजे मुलाखत घेणाऱ्या माझ्या जुन्या कंपनीच्या बॉसला कुठे तरी पहिले आहे अस वाटत होत. आणि त्यानेही तोच प्रश्न विचारला. आणि मीही मस्करीत तेच उत्तर दिल. त्यांनंतर एकदा असंच माझ्या जुन्या कंपनीतील एक सहकारी बाहेरच्या खोलीत एका मुलीविषयी मला काही तरी खुपंच भयंकर काही तरी सांगत आहे अस स्वप्न पडलं. बर जी मला ते सांगत होती ती त्यावेळी आमच्या कंपनीत जॉईन देखील झालेली नव्हती. आणि ती ज्यावेळी तेच घडतं होत. त्यावेळी स्वप्नात जेवढा घाम फुटला होता त्याहून अधिक घाम फुटला होता.

पण एक गोष्ट आहे जेव्हा स्वप्न पडतात त्यावेळी त्याबद्दल काहीच वाटत नाही. आणि ते स्वप्न सत्यात येते त्यावेळी कुठे तरी पहिले आहे अस वाटत रहात. आणि मग कुठे पहिले ह्याचा विचार केल्यावर लक्षात येत. बर सकाळी उठल्यावर संपूर्ण स्वप्न आठवतच नाही. काही काही खूप फालतू स्वप्न पडली होती. आणि त्यानंतर ज्यांच्या बद्दल पडली होती, त्यांच्याशी नजर भिडवायची देखील हिम्मत होत नाही. एकदा माझी लहान बहिण मला सारखं सारखं फोन करत जाऊ नको अस मला सांगत आहे अस स्वप्न पडलं होत. त्यावेळेपासून मी आजकाल तिला फोन करायला देखील टाळतो आहे. तस मला पडलेल स्वप्नाबद्दल मी तिला सांगितले आहे. काही कधी हे संकेत आहेत अस वाटत. पण ज्यावेळी असे संकेत कळतात त्यावेळी हे संकेत आहे हे कुठ माहिती असत. आणि स्वप्नात काही सुद्धा घडतं. त्यामुळे त्यावर विश्वास देखील  कसा ठेवायचा. जाऊ द्या.

माझ्या बंधुराजांना मी त्याचा पतंग काढून घेतल्याची स्वप्न पडतात. आणि बंधुराज स्वप्नात असतात, पण मोठ मोठ्याने ‘आई, दादाने माझा पतंग घेतला’ अस ओरडतात. शाळेत असताना मलाही असच स्वप्न पडलं होत. स्वप्नात मी एका खूप मोठ्या इमारतीच्या छतावर उभा होतो. किती उंच आहे म्हणून मी वरून खाली पाहत होतो त्यावेळी कोणी तरी मला धक्का दिला आणि मी खाली पडलो. बर इतक्या उंचावरून पडलो तरी मला काही सुद्धा झाल नाही. पण एक मोठ्या शिंगांचा बैल माझ्या अंगावर धावून आला. त्यावेळी मी दचकून जागा झालो होतो. आणि पाहतो तर मी घरातच होतो. पण घामाच्या धारा देखील लागल्या होत्या. आणि त्या स्वप्नानंतर मी उंचावरून खाली पाहताना अजूनही कशाचा तरी आधी आधार घेतो आणि मग पाहतो. उगाच ते स्वप्न देखील संकेत असेल तर.


प्रतिक्रिया व्यक्त करा

आपला ई-मेल अड्रेस प्रकाशित केला जाणार नाही.