स्वरूप पहा


काल माझ्या एका परम मित्राने मला एक इमेल पाठवला. त्यात दोन छायाचित्र आहेत. एकात मनसेचे उर्दूत पोस्टर आहे. आणि दुसऱ्यात मनसेचा एक उमेदवार युपी भैय्याकडे मतासाठी हिंदीत बोलत आहे. इमेलच्या सुरवातीलाच ‘फ़क्त मुस्लिमांच्या मतांसाठी उर्दू भाषेत पोस्टर लावले. मुस्लिमाना मराठी समजते मग कशाला ही नाटके….? हेच का तुमचे मराठी प्रेम………?‘ अस लिहिलं आहे. बघून खरच दुख झाले. पण आपण त्या विषयावर नंतर बोलू. माझा जो मित्र आहे. म्हणजे ज्याने हा इमेल पाठवला. याचा इतिहास आपण आधी बघू. याने अजूनपर्यंत कधी मतदान केलेलं नाही. मागील लोकसभेच्या निवडनुकीच्या वेळी त्याला विचारलं मतदान करणार का? तर साहेब नाही म्हणाले. ह्या आधीही कोणत्याच निवडणुकीला मतदानाचा हक्क बजावला नाही आहे. हा मराठीचा दाता आपल्या मुस्लीम रूममेटशी हिंदीत बोलतो.

आम्ही जेव्हा जेवायला हॉटेलात जातो त्यावेळी वेटर मराठी आणि हा त्याला हिंदीत ‘पानी लाव’ अस म्हणतो. बर ते तर सोडून द्या, ह्याचा बॉसला मराठी समजते पण हे दोघेही एकमेकांशी हिंदीत बोलतात. आता मला सांगा अशा माणसाकडून मी मराठी प्रेम शिकायचे का? राज ठाकरे किंवा मनसे गेले खड्ड्यात, पण काय त्यांनी मराठीचा ठेका घेतला आहे का? आपण स्वत हिंदीत बोलायचे आणि त्यांनी बोललं की नाव ठेवायची. बर हे आमचे परम मित्र मराठीसाठी काय करतात म्हटलं तर शून्य. जाऊ द्या, परवा राज ठाकरे बुलशेट म्हणणारा सुद्धा मतदान करत नाही. तोच काय पण आमच्या कंपनीतील कोणीच मतदानाला जात नाहीत. पण नाव ठेवायला सांगा. आपल्या देशात एक देशप्रेम नसलेली आणि स्वत काही न करणारी पांढरपेशी जमात आहे. ह्यांचा एकच धंदा नाव ठेवणे. शरीरातील पांढऱ्यापेशी रोगाविरुद्ध लढतात. आपल रक्षण करतात. आणि ही पांढरपेशी जमात मतदान करत नाही. कधी घराच्या चौकटीतून बाहेर पडत नाही. बर जर पडली तर शॉपिंगसाठी, किंवा भेलपुरी नाही तर सांडविच- बर्गर खाण्यासाठी. उद्या चुकून एखादा आतंकवादी ह्या पांढरपेशी जमाती समोर आला तर हे हार्टट्याकने मरतील. काय बोलायचं ह्यांच्या बद्दल. ते म्हणतात न ‘दुसऱ्याला सांगे ब्रम्हज्ञान स्वत कोरडे पाषाण’ तसं आहे ह्याचं.

माझ ना त्या इमेल आल्यापासून ना डोक सरकलं आहे. मागील एका आठवड्यापासून रोज काही ना काही नाटक चालूच आहेत यांची. स्वत काही करणार नाहीत. आणि दुसर्यांना नाव ठेवणार. एवढाच जर राग असेल जाऊन अडवा ना त्या उद्धव आणि राजला. ह्यांचे दोस्त अमराठी म्हणून यांना त्यांचा पुळका. बर इतके दिवस मी जाऊ दे म्हणून टाळत होतो. पण रोजच्या रोज नाटके. बर मला राष्ट्रप्रेम शिकवतात. हिंदी ही राष्ट्रभाषा आहे असं म्हणतात. पण मतदान करा म्हटलं की कुठ काय. सगळ फूस. मग कारण, कोण एका दिवसासाठी गावी जाणार? त्यासाठी दोन- तीन दिवस मोडणार. आणि पैसे पण खर्च होतात ना. बर काही मित्रांचे अजून नाव नाहीत मतदार यादीत. पंचवीस वर्षाचे घोडे झालेत अजून नाव नाहीत. अस बहुतेक माझ्या सगळ्या मित्राचं आहे. नोकरीच्या निमित्ताने पुण्यात स्थायिक झालेत. निवडणुकीचे ह्यांना सुख ना दुख. मीच एकता मुर्खासारखा सुट्ट्या घेऊन गावी जातो मतदानाला. सहा महिन्यांपासून रेशनकार्ड येत आहे पुण्यातलं. त्यामुळे माझ इथ मतदार यादीत नाव नाही. गावाकडे आहे. आता सुट्टीचा इमेल उद्या पाठवावा लागेल बॉसला. मी शाळेत असताना एक मराठीच्या पुस्तकात धडा होता, विनोबा भावेंचा. बहुतेक दहावीच्या मराठीच्या पुस्तकात. त्यात विनोबा भावेंचं एक वाक्य आहे ‘स्वरूप पहा विश्वरूपाची चिंता करू नका’. धडा बाकी मस्त होता. मला खूप आवडायचा. म्हणजे एक गोष्टच वाटायची. आणि हो त्या इमेलला मी प्रतिसाद दिला बर का

नमस्कार साहेब, बघून वाईट वाटले पण खर तर त्याहून अधिक वाईट वाटले की हे तुम्ही म्हटले. आता राज ठाकरे गेला खड्ड्यात पण तुम्ही स्वत मराठी म्हणुन काय करता? कधी मतदान करता का? निदान आपल्या सगळ्या रूममेटशी तरी मराठीत बोलता का? ह्या दोन गोष्टी करा म्हणजे उर्दूमध्ये किंवा भय्याकडे कोणी जाणार नाही. बराच काही बोलायच आहे पण थोडक्यात सांगतो ‘स्वरुप पहा’


प्रतिक्रिया व्यक्त करा

आपला ई-मेल अड्रेस प्रकाशित केला जाणार नाही.