हंग्रेज अध्यक्षांची मुलाखत


सुरवातीला अभिनंदन करतो, आपण सलग चौथ्यांदा अध्यक्ष झालात त्याबद्दल. आणि आभार मानतो आपण मुलाखतीला वेळ दिल्याबद्दल. तर सुरवात करूयात?
अध्यक्ष– इश्श..
मी– काय झालं?
अध्यक्ष– काय झालं काय, भारतीय महिला अस खूप आनंदी झाल्यावर असंच करतात ना?
मी– हो, पण..
अध्यक्ष– पण काय? मला तर आजी नेहमी भारतीय महिलांचे वागण्याच्या पद्धती सांगत असतात.
मी– अच्छा.
अध्यक्ष– माझी साडी कशी आहे?
मी– काय? म्हणजे तुम्ही अस का विचारलंत? हे देखील आजींनी सांगितलं?
अध्यक्ष– माझ्या सासूबाईंनी मला घेतली होती. आज तिची घडी मोडली. त्या अहमदला विचारलं तर तो बोलला की, आमच्यात बायका बुरखेच घालतात. त्यामुळे मी कसं सांगू शकतो. म्हणून तुला विचारलं.
मी– आपण हे नंतर बोलुयात? माझीच मुलाखत चालू असल्याचा मला भास होतो आहे.
अध्यक्ष (हसून)- बर, कर सुरु..
मी– आपण गेल्या बारा वर्षापासून हंग्रेजचे अध्यक्ष आहात. काय फरक जाणवतो त्यावेळी आणि आता?
अध्यक्ष– त्यात काय जाणवायचे? जे काय ते जनताच जाणवते आहे.
मी– अगदी बरोबर.
मी– मला फक्त अस विचारायचे होते. आपण काय कार्य केलंत या बारा वर्षात, म्हणजे एका तपात?
अध्यक्ष– तापात मी काय करू शकते?
मी– ‘तपात’ म्हटले ‘तापात’ नाही.
अध्यक्ष– अच्छा, अस्स! हंग्रेज सत्तेवर आणले. शिस्त लावली पक्षाला. मुळी शिस्तच नाही इथल्या लोकांना.
मी– बरोबर आहे. राजकारणात आणि पक्षातील समतोल सांभाळताना अडचणी?
अध्यक्ष– हंग्रेज पक्षाचा जन्मच मुळी.. माझे पान कुठे गेले रे??
अध्यक्ष– पक्षाचा आणि देशाचा इतिहासाची माहिती सांगायची झाली तर अहमदने लिहून दिलेलं. आता दोन्ही एकत्र झाले. हा, बहुतेक हेच. देश महात्मांच्या आदर्शाने लढला. आणि स्वातंत्र्य मिळाले. आणि त्यानंतर देशाचा विकास हाच मुद्दा घेऊन पक्ष लढला.
मी– कोणाशी?
अध्यक्ष– निवडणुका रे!
मी– पण विकास कुठे झाला?
अध्यक्ष– झाला ना! अस कसं म्हणतोस तू? त्यावेळी संसदेत खासदार बसने येत. आता प्रत्येकाची स्वत:ची गाडी असते.
मी– अरे हो, त्यावेळी ताशे होते, आता ढोल झालेत. काही काही तर नगारे.
अध्यक्ष– बघ, बरोबर म्हटले ना! म्हणजे मलाही मुद्दे खोडता येतात. अजून सांगू..
मी– हो हो!
अध्यक्ष– सापडलं, हं. आम आदमीसाठी नेहमीच हंग्रेज पक्ष कटिबद्ध राहिला. आणि विशेषतः आदिवासी लोकांसाठी वचनबद्ध आहे. काय रे ‘वचनबद्ध’चा अर्थ काय होतो?
मी– म्हणजे त्या शब्दाचा अर्थ माहित नाही तुम्हाला?
अध्यक्ष– मुळात आदिवासी म्हणजे काय असते हेच माहित नाही मला. बर ते सोड तू पुढचा प्रश्न विचार. मी अहमदला विचारून घेईल त्याचा अर्थ.
मी– गेल्या निवडणुकीत तुम्ही जो अर्ज भरला त्यात तुम्ही स्वत:चे घर गाडी नाही अस म्हटलं आहे..
अध्यक्ष– काही पण काय, माझ्या नावावर नसले म्हणून काय झाले. ह्यांच्या नावावर मी खूप काही केल आहे एका तपात.
मी– हे कोण?
अध्यक्ष– भारतीय स्त्रिया ह्यांचे नाव घेत नसतात. ‘हे’ म्हणजे राहुलचे बाबा.
मी– पण सगळेच राहुलला ‘राहुलबाबा’ असे म्हणतात.
अध्यक्ष– बास हं मस्करी, राहुलचे पप्पा अस म्हणायचे होते मला.
मी– पण राजीव बाबांच्या नावावर कुठे काय आहे?
अध्यक्ष– हेमंत मग हे काय आहे? तूच तुझ्या नोंदीत उल्लेख केला आहे ना!
मी– अरे हो, चुकलंच की माझे.
अध्यक्ष– तू तर फारच कमी टाकलस, मला नाही आवडल ते. तू आडवाणी काकांचे ही नोंद वाचले नाही का? वाच कळेल तुला मी मागील बारा वर्षात काय केले ते.
मी– अरे, चुकल माझ. मी भाजीपाल्या वाल्याचा नाही ना. त्यामुळे राहिले.
अध्यक्ष– इथेच तर चुकते तुम्हा मराठी माणसांचे. मी तरी कुठे भाजीपाल्या वाल्याची आहे. पण मला माहिती आहे. सगळी माहिती ठेवावी माणसाने.
मी– अगदी बरोबर. यावेळचे अध्यक्ष म्हणून काही योजना नक्की बनवल्या असतील.
अध्यक्ष– खूप आहेत रे. निवडणुका जवळ आल्यात. त्यासाठी काम करायचे आहे. राहुलच्या लग्नासाठी कोणी ‘हो’ म्हणेल काय, एखादी शोधायची आहे.
मी– त्यांना कोणीही हो म्हणेल.
अध्यक्ष– नाही रे, तू म्हणतो तेवढ सोप नाही आहे. मा चे दर्द मा च जाणत असते. चल आता मला मिटींगला जायचे आहे. थोडा वेळ उशीर झाला तर तो बाहेर नाऱ्या आहे. उगाच काही तरी नेहमी तक्रारी घेऊन येत असतो. पुन्हा मागे लागेल.
मी– ठीक आहे. राहुल बाबांच्या लग्न लवकरात लवकर होवो, अशी सदिच्छा. आणि तुम्ही वेळ दिल्याबद्दल आभार..
अध्यक्ष– उखाणा घेऊ?
मी– कशाला?
अध्यक्ष– ते शेवटी उखाण्याचा कार्यक्रम असतो ना? मला सांगितले आहे आजींनी.
मी– हो, पण तुम्ही..
अध्यक्ष– बर ठीक आहे. मी वाचून दाखवते..
मी– घ्या..
अध्यक्ष– फाईव्ह प्लस फोर इज इक्वल टु नाइन
हंग्रेस इज माइन..
मी– अगदी पटल.


प्रतिक्रिया व्यक्त करा

आपला ई-मेल अड्रेस प्रकाशित केला जाणार नाही.