हाक


हाक मारण्याच्या अनेक मजेशीर पद्धती आहेत. मी रोज ज्या खानावळीत जेवणाला जातो तिथे तर, अनेक नवनवीन पद्धती पाहायला मिळतात. वाढपी करणाऱ्यांची नावे जवळपास कोणालाच माहित नाहीत. मलाही नाही. मग त्यांना हाक मारण्यासाठी कोणी ‘शुक शुक’, तर कोणी ‘मित्रा’. दोन दिवसांपूर्वी तर ‘सुकs सुक’ हो! ‘सुक सुक’. ‘शुक शुक’, ओ, अरे, चूक चूक आतापर्यंत ऐकलेल. हे सुकsसुक ऐकून हसू येत होत. म्हणजे उच्चारण्याची पद्धत जाम मस्त होती.

एक गडी मध्यंतरी एका भाजी वाढणाऱ्या वाढपीला ‘अय’ म्हणालेला. झाल, दोघात जाम जुंपली होती. ‘ए’ म्हणून ठीक आहे. पण कदाचित त्याला आवडले नसावे. कठोर आवाजात ‘अय’चा अर्थ वेगळा निघतो. पण खेडेगावात अजूनही, खेडेगावातच काय नगर मधील नगरी लोक अजूनही एकमेकांना हाक ‘अय’ म्हणूनच मारतात. ‘ए’ चा गावठी मराठीत ‘अय’ असा उच्चार होतो. जस् ‘हो’ चा ‘व्हय’. काहीजण हाक मारण्यासाठी ‘बॉस’ शब्द वापरतात. हा मुंबईकरांचा शब्द. तस् मुंबईत अजून ‘भाय’ आणि ‘भय्या’ शब्द जास्त प्रमाणात वापरतात. पुण्यातही भय्या वापरतात. पण फार नाही. बाकी बाळू, बाळ, बेटा, बंटी, बंट्या, बंड्या हे रुळलेले हाक मारण्यासाठी वापरले जाणारे शब्द. मी ‘साहेब’ शब्द वापरतो. माझ्या गावाकडे तरुण आणि लहान मुलांना ‘पिंट्या’ शब्द वापरतात. माझा एक मित्र करमाळ्याचा. तो ‘लेका’ शब्द वापरायचा. तस् शिट्या मारणे हे देखील हाका मारण्याच्या प्रकारातील एक. पण त्यावर न बोललेलंच बर. कारण शिट्या हा खूप मोठा विषय आहे. आणि बहुरंगी देखील. गल्लीतील पोरांची टोळकी साधारणतः एकमेकांना आवाज देण्याचे सोपे साधन म्हणून शिटी वापरतात. तशी एक नवीन नाही परंतु, जीभ टाळ्याला लावून ‘टॉक टॉक’ करण्याची पद्धत आजकाल रूढ झाली आहे.

बाकी मामा, दादा, नाना, अंकल शब्द अजूनही एकमेकांना बोलावण्यासाठी वापरले जातात. थोडे इरिटेटिंग, म्हणजे खास करून ‘अंकल’ दुसर्याला मुद्दाम इन्सर्टसाठी वापरला जाणारा हमखास शब्द. तसे कंपन्यात ‘सर्’, ‘मॅडम’ शब्द. आणि मुलींना इरिटेट करण्यासाठी ‘बेहेनजी’ हे शब्द वापरले जातात. गावाकडे ‘पाटील’ हा एक मानाचा शब्द. माहित नाही या शब्दांचा उगम आणि मान आणि दर्जा कसा ठरवला गेला. पण प्रत्येक हाकेला आणि हाक मारणाऱ्या व्यक्तीला त्याने राग किंवा आनंद नक्कीच होतो. जे रुळलेल शब्द आहेत ते ऐकून हाक दिलेली व्यक्ती हाक मारणाऱ्या व्यक्तीकडे आपला रोख करते. परंतु, ह्या हाकेच्या अनेक पद्धती वेगवेगळया आणि मजेशीर आहेत.


प्रतिक्रिया व्यक्त करा

आपला ई-मेल अड्रेस प्रकाशित केला जाणार नाही.