हेडफोन


कानातले घातल्याशिवाय आजकाल कोणी कुठेही जात नाही. म्हणजे ‘हेडफोन’ अस म्हणायचे होते. रोज सकाळी बसमध्ये जवळपास सर्वच ‘बुजगावणे’ ते कानातील घालून असतात. आज माझ्या शेजारी बसलेली सुद्धा! आणि बाईकवरील हिरो आणि होंडाना पर्याय नाही म्हणून की फॅशन म्हणून त्यांनाच माहित. माझे मित्र आहेत ना काही, बाईकवर रस्त्याच्याकडेला गप्पा मारतांना सुद्धा ते कानातील काढणार नाहीत.

आता हे ‘मोबाईल मॅन’ आपल्याशी अस कानातल न काढता बोलले तर राग येणार नाही का? तसे मी देखील दिवसभर डेस्कवर असाच कानातले घालून बसलेलो असतो. पण त्याचे एक कारण म्हणजे माझ्या समोरच्या कॉलममध्ये बसणाऱ्या टीम मधील मुली असले विनोद करतात ना, की ऐकून हसायला येत. आता त्यांचा आणि माझा काही संबंध नाही. मग मी असाच हसायला लागलो तर ते विचित्र वाटेल. म्हणून मी कानातले घालून बसतो. पण अतिरेक नाही करत. कोणी माझ्याकडे आले, की ते काढून ठेवतो. कुठल्याही गोष्टीचा अतिरेक हा वाईटच असतो. आणि दुसरे कारण म्हणजे हे बाजूचे पहिलवान फोनवर मिटिंग करतात. आणि डेस्कवरील फोनवर लाउड स्पीकर ऑन करून बोलतात. असो, त्यांचा काय दोष त्यांना मिटिंग रूमच मिळत नाहीत. त्यामुळेही मी मला त्रास नको म्हणून मग कानातले वापरतो.

पण रस्त्यातून चालतांना त्या कानातल्यांची काय मोठी आवश्यकता असते ते कळत नाहीत. असे मोबाईल मॅन येत जाता अनेकवेळा मी बघितले आहे. थोडे विचित्रच वाटते. जेवतांना देखील मी काही ‘मोबाईल मॅन’ बघितले आहेत. आवाज किती यावर काय बोलत नाही. आता कानातले गाणी ऐकतांना दुसर्याशी बोलतांना त्यांचा व्हॉल्यूम अचानक वाढतो. का वाढतो यावर काही बोलून फायदा नाही.

थोड्या वेळापूर्वी मी फ्रेश होण्यासाठी म्हणून त्या बाथरूममध्ये गेलो होतो. मी आरश्यात बघून तोंड धूत असतांना एक ‘मोबाईल मॅन’ कानातील घालून टायलेट मधून बाहेर येतांना पहिला. पाहून थक्कच झालो. आता थक्क होण्यापलीकडे माझ्याकडे दुसरा काही पर्यायाच नव्हता. जगात प्रेम कोणावर करावं आणि कुठे करावं याला काही ‘नियम’ नसतात. अस ऐकल होते. दोन दिवसापूर्वी तो रामूचा ‘निशब्द’ पाहतांना ढोकळ्याचा एकही घास घशाखाली उतरला नाही. रामूची ही खासियतच आहे. खूपच विचित्र वाटत होते. पण आज तो ‘मोबाईल मॅन’ नाही नाही ‘टायलेट मॅन’ पाहून अजूनही किळसवाणे वाटत आहे. असो, लोकशाहीने प्रत्येकाला कुठेही काहीही आणि कधीही करायचे स्वातंत्र्य दिले आहे. आणि शेवटी प्रत्येकाची इच्छा. कोण काय बोलू शकते?


प्रतिक्रिया व्यक्त करा

आपला ई-मेल अड्रेस प्रकाशित केला जाणार नाही.