विचारवंतांचे तांडव


आजकाल राजकारण म्हणजे वाईट असे म्हणणाऱ्या विचारवंतांची एक पिढी जन्माला आली आहे! ही प्रजाती सगळीकडेच आढळते. हे स्वतःला सकारात्मक समजतात. मी अन माझं घर हेच काय ते घोषवाक्य! बरं घोषवाक्याबद्दल काही म्हणणे नाही. परंतु ही जमात सर्वच राजकारण्यांना भोंदू, स्वार्थी व भ्रष्ट्राचार समजते. मुळात अशांना राजकारणाचा जाम तिटकारा आहे.

त्यांच्या मते ह्या देशाचे सर्व वाटोळे ह्या राजकारण्यांनी करून ठेवले आहे. व हे बदलणे शक्य नाही. आणि सर्वात महत्वाचा मुद्दा आपण एकटे बोलून काही फरक पडणार नाही, तर मग कशासाठी आटापिटा करायचा. ह्याच दृष्टिकोनातून हे जगाची उठता बसता माप काढत असतात. त्यांचे प्रत्येकच मत चुकीचं आहे असं नाही. परंतु त्यांच्या मते राजकीय  बाळगणारा वा भाष्य करणारा मूर्ख आहे! इथेच सगळी गोम आहे! जर हाच विचार करायचा म्हटलं तर भविष्यात राजकारण करणे खेळाइतकेच दुर्लक्ष होईल. चुरस सोडा पण निवडणुकीसाठी कोण उभे राहणार नाही. व कदाचित देश चालवण्यासाठी देखील आपल्याला नेते आयात करावे लागतील. ही प्रजाती असे मानते की राजकारणाने काही फरक पडत नसतो.

सोपं उदाहरण देतो. जर ह्या सरकारने एखाद्या करामध्ये वाढ केली तर प्रत्यक्ष वा अप्रत्यक्ष झळ सामान्यांना बसणार! उलट जर कर कमी केला तर त्याचा सकारात्मक परिणाम देखील दिसेल. देशाच्या नव्या सरकारने जागतिक पातळीवर कच्च्या इंधनाचे प्रति बॅरेल दर जेंव्हा २९ डॉलरपर्यंत घसरले होते त्यावेळी कर १२२% करवाढ केली नसती तर कदाचित आज आपण इंधनात किमान १० रुपये प्रति लिटरचा फरक पाहू शकलो असतो. जर राजकारण वाईट असते तर जगातील बहुतांश देशांनी लोकशाही का स्वीकारली असती? कशासाठी राजकारण करत बसले असते. त्या प्रजातीला राजकारण आणि राजकारणातील लोक म्हणजे दोन गोष्टी नसून एकच गोष्ट आहे असे वाटते. मूलतः राजराणातील माणसे भ्रष्ट तेंव्हा होतात जेंव्हा समाज निद्रिस्त असतो. आज राजकारणात वाईट लोकांची संख्या अधिक आहे याचे कारण समाज त्याला विरोध करत नाही!

आपण आपल्यातील अवगुणांचे दोष राजकारण्यांना देतो. ही प्रजाती हे लक्षात घेत नाही की राजकारण हा विषय मनुष्य जीवनाचा अविभाज्य घटक आहे. मग तो कालखंड कोणताही असो! रामाच्या काळातही राजकारण होते व आताच्या! महाभारतात देखील कौरवांनी एका अबला स्त्रीवर हात टाकला होता! कारण कौरव वाईट होते! राजकारण हे राजकारण आहे! यात कुटिलात देखील येते अन कल्याणाची भावना. जो व्यक्ती प्रमुखस्थानी आहे त्यावर बराचसा खेळ अवलंबून आहे. आपला उद्योग/व्यवसाय सांभाळून राजकीय मते बाळगणे माझ्यामते तरी अयोग्य नाही!


प्रतिक्रिया व्यक्त करा

आपला ई-मेल अड्रेस प्रकाशित केला जाणार नाही.