होली का?


काल सकाळी इमारतीच्या बाजूच्या मोठ्या आवाजातील गाणी आणि धांगडधिंगाने जाग आली. बाहेर येऊन बघितलं तर ‘धुळवड’ चाललेली. अरे नाही ‘होळी’, नाही नाही ‘होली’. मग समजलं, पुण्यात ‘होळी’ सणापेक्षा मोठा सण साजरा होतो तो ‘होली’. माझी लहान भाऊ बहिण परवा रात्री माझ्या घरी सुट्टीला आले होते. भाऊ काल पर्यंत होता. पण लहान बहिण ताबडतोप घरी गेली. मला वाटल की काही तरी काम असेल. नंतर कळले ती तो ‘होली’ साजरा करायला गेली. गावी असताना आम्ही गल्लीतील होळीच्या बाजूचा चिखल होळीच्या दुसऱ्या दिवशी खेळायचो. आणि सुट्टी देखील धुळवडीची मिळायची. मस्त मजा यायची. आई त्या होळीच्या विस्तवावर पाणी गरम करून घेऊन जायची. आणि आम्ही सगळे एकमेकांना झालेला चिखल मारण्यात आणि त्यात लोळवण्यात दंग असायचो. अजूनही गावी आणि नगरमध्ये असेच चालते.

आणि मग रंगपंचमीला काय विचारूच नका. रंगात सगळी गल्ली न्हाऊन निघते. पण जबरदस्ती वगैरे काही होत नाही. पण पुण्यात आल्यावर हे काही तरी भलतेच बघतो आहे. पुण्यात रंगपंचमीला कोणीच रंग खेळताना दिसत नाही. आणि धुळवडीच्या दिवशी रंग खेळतात. हे अस उत्तर भारतात चालत. पण हे पुण्यात देखील घडतं आहे. ते आत्तापर्यंत लालूची, बच्चनची  ‘होली’ टीव्हीत पाहत आलेलो. आणि रंग खेळतांना गाण्यांची आणि ते देखील मोठ्या आवाजात यांचा संबंध काही समजल नाही. बर संध्याकाळी मी तीच्या लहान बहिणी बरोबर फिरायला गेलो होतो. त्यावेळी ती देखील ‘होली’ बद्दल सांगत होती. बर हे रंगून सगळे होलीकेचे वंशजच वाटतात. काय ते भयानक चेहेरे असतात. रंग लावतात की ऑइलपेंट देवास आणि जे लावतात त्यांनाच ठाऊक.

काकाला विचारलं तर तो बोलला ‘अरे, पिंपरीत सिंधी लोक खूप जास्त प्रमाणात आहेत. आणि ते धुळवडलाच रंगपंचमी खेळतात’. आणि सकाळी माझ्या काही मित्रांचे ‘होली’ एसएमएस आले. टीव्हीवर देखील मराठी वाहिनीवाले ‘होली’ तच बुडालेले. परवा होळी मस्त झाली होती. पण आज ही ‘होली’ बघून पुण्याचाही ‘मुंबई’ होते की काय अस वाटत होते. मग आशा पुन्हा बोलेल ‘पुणे सर्वांचे आहे’. हे नाही तर ‘पुण्यावर प्रत्येक भारतीयाचा हक्क आहे’. मला एक गोष्ट कळत नाही ह्यांची मन एवढी मोठी असेल तर त्यांचे राजवाडे आणि महाल सगळ्या देशाचे आहेत अस का म्हणत नाही? त्यावेळी फ़क़्त ‘मुंबई’च कशी काय सापडते. सोडा तो विषय. धुळवडीच्या दिवशी रंगपंचमी बघून थोडा माझा गोंधळ झाला होता. उशिरा म्हणतोय म्हणून माफ करा. होळीच्या, धुळवडीच्या आणि येणाऱ्या रंगपंचामीची तुम्हाला शुभेच्छा. बाकी बोलूच.


प्रतिक्रिया व्यक्त करा

आपला ई-मेल अड्रेस प्रकाशित केला जाणार नाही.