हो की नाही


काय सुचेनास झालं आहे. वडिलांचा सकाळी फोन आला होता. मला त्यांनी ‘पुण्यातील त्या स्थळाबद्दल तुझा काय निर्णय आहे’ अस विचारलं. वडिलांना संध्याकाळी फोन करून सांगतो म्हणून म्हटलं. सकाळपासून खूप विचार केला पण हो म्हणू की नाही म्हणू अस झालं आहे. कारण त्या स्थळाने पाहण्याच्या कार्यक्रमानंतर ‘हो’ म्हणून सांगितले. मग पंधरा दिवसांनी ‘नाही’ म्हणाले. त्यानंतर पुन्हा काय झाले कुणास ठाऊक, महिना उलटल्यानंतर पुन्हा ‘हो’ झाले. परत आठ दिवसांनी ‘नाही’ म्हणाले. आणि आता दोन महिन्यानंतर त्या स्थळाचा ‘बोलणी करायला कधी येता’ असा फोन आला. त्यांना वडिलांनी आता नक्की ‘हो’ आहे का अस विचारल्यावर ते म्हणाले आता आमचा निर्णय झाला आहे. मग वडिलांनी मी मुलाशी बोलून तुम्हाला कळवतो म्हणून त्यांना सांगितले. आता काय निर्णय घ्यावा?

माझ्या बहीणाबाईने मला ‘हा निर्णय मोठे लोक घेतील. तू नाक खुपसू नको’ असा सल्ला दिला. यार हे असले प्रश्न खरंच अवघडात टाकतात. मला ती मुलगी आवडली होती. ती खूप छान आहे. आणि तिचे देखील ‘हो’ होते. पण त्यांच्या घरच्यांच्या धरसोड वृत्तीमुळे मी तो विषय सोडून दिला होता. आता परत कसा विचार करू? आणि मुळात आता पुन्हा ‘नाही’ म्हणणार नाहीत कशावरून? बर, मला चांगली स्थळे येत नाही असे नाही. खूप छान छान मुली येत आहे. जवळपास सर्वांशीच ‘गुण’ जुळतात. पण कोणाची राशीमैत्री, तर कोणाची ग्रहमैत्री जुळत नाहीत. आता ह्या सुरवातीच्या स्थळाचे सर्वच जुळले होते. पण त्यांनी ‘हो नाय हो’ केला. त्यामुळे माझ डोक जाम झालं आहे. बाकीचे कोणतेच स्थळ जुळले नसेल म्हणून मला ते स्थळ हो म्हणते आहे का? अशी शंका येते.

आत्ता आईचा फोन आला होता. काय निर्णय घेतला म्हणून. तिला म्हटलं डोक दुखायला लागल आहे. आणि निर्णय अजून झाला नाही. वडिलांकडे फोन गेल्यावर मग मी सारवासारव केली. त्यांना म्हटलं आधी त्यांचे नक्की काय ते आधी ठरवा. मग मी ठरवतो. पण अजूनही मनात गोंधळ आहे. जीवनाचा प्रश्न आहे. तीच्या आई वडिलांचे जाऊ द्या पण तिचाही स्वभाव असाच धरसोड असेल तर माझी तर वाटच लागली ना. मित्राशी याविषयावर बोललो तर त्याने ‘हो’ म्हणून टाक असा सल्ला दिला. सकाळी याच विचाराच्या नादात कंपनीचे आयडी कार्ड विसरलो. बस स्थानकावर आल्यावर लक्षात आले. मग काय परत कंपनीचे आयडीकार्ड आणण्यासाठी घरी आलो. परत बस स्थानकावर जाण्याआधीच बस निघून गेली.

दुपारी जेवतांना आमच्या कंपनीतील हिरोइन्स बघतांना विचार आला की ‘हो’ म्हणाल्यावर हे अस टाईमपास करणे देखील बंद होईल. दोन पाच मिनिटांसाठी डोक एकदमच सुन्न झालं होत. सगळंच बदलेल. हे लग्न प्रकार ना कधी कधी योग्य वाटतो तर कधी अयोग्य. कधी लग्न करावे अशी खूप इच्छा होते तर कधी करूच नये अशी इच्छा होते. हे लग्न म्हणजे काय? आहे नक्की कळत नाही. कधी लग्न म्हणजे प्रश्न वाटतो तर कधी जीवनाचे उत्तर. कधी लग्न म्हणजे कोडे वाटते, तर कधी कोड्याचे उत्तर. अस वाटते आहे की लग्न म्हणजे बंद कुपीतले अत्तर. असो, आज तर डोक जाम झालं आहे. एकदा वाटत ‘हो’ म्हणून टाकावं. पण मग मनात नाही नाही त्या शंका येतात. मग परत ‘नाही’ म्हणावं असा निर्णय घ्यावासा वाटतो. पण शेवटी निर्णय ठाम होत नाही आहे.


प्रतिक्रिया व्यक्त करा

आपला ई-मेल अड्रेस प्रकाशित केला जाणार नाही.