३१ डिसेंबर


काय दिवस होता. कधीही आयुष्यात हा दिवस विसरणे शक्यच नाही. आणि खर बोलायचे तर मलाही विसरायचा नाही हा दिवस. मला माहिती आहे. जे घडायचे होते तेच घडले. पण ते ज्या पद्धतीने घडले, ते तसे घडेल अस कधीच वाटले नव्हते. आणि माझी तिला मनातलं सांगायची देखील इच्छा पूर्ण झाली. मला माहिती आहे, हे सांगायला खुपच जास्त वेळ गेला. कदाचित कधीच बोलू शकलो नसतो. आणि मनात राहून कुढत बसलो असतो. पण हे सर्व, जे घडले याचे श्रेय फक्त तुम्हालाच आहे. खरच तुम्ही नसता तर ‘काहीच’ घडल नसत. आणि तिच्याबद्दल काय बोलू? तीच मन खरच खूप मोठ आहे.

त्या २९ डिसेंबरलाच बोलणार होतो. पण मी शेवटी ‘शूरवीर’. सोडा, आता नको ते सर्व. माझे मित्र, थोडक्यात माझी ‘सेना’. त्यांच्याच भाषेत बोलायचे झाल्यास ‘डी गँग’. आता ह्याच बारस त्यांनी माझ्या ‘फेअरवेल’च्या वेळी गिफ्ट देतांना केल. मला नाव सुचवायला सांगितले असते तर.. जाऊ द्या. उगाच माझ एन्काऊंटर करतील. त्यांनी केलेली मदत. त्यांनी माझा सहन केलेला त्रास आणि तुम्हीही. खरच तुम्हा सर्वांची झालेली मदत माझ्यासाठी ‘अनमोल’ आहे. आणि तिच्याबद्दल बोलायला शब्दच नाहीत. तीने दिलेला ‘तो वेळ’ आणि दाखवलेला समजूतदारपणा आणि मनाचा मोठेपणा खरच अवर्णनीय आहे. असो, आभार प्रदर्शनात फार वेळ घालत नाही.

३० डिसेंबरला माझ्या मित्रांनी इतकं सतावल ना. तिला बोल बोल करून, जाम वैताग आलेला. बर हे ‘टिप्स’चे डोस इतके झाले आहेत ना आता. त्या रेडिओवर ‘लवगुरू’ नावाचा एक कार्यक्रम लागतो. त्यात माझे हमखास सिलेक्शन होईल.

३० डिसेंबरला सकाळी तिला पिंग केल तर, ती ‘बिझी’. तिची ती टॅग लाईनच आहे म्हणा! बर दुपारी जेवण्यासाठी कॅन्टीनमध्ये आलो तर माझी ‘सेना’ ती आणि तिचा ग्रुप बसलेला त्याच्याच थोड्या बाजूला. काय यार, अस ते नेहमी करतात. आता ते अस का करतात, हे सांगायला नको. निमित्त फक्त ‘मी’ कारण ‘वेगळ’. पण त्या दिवशी दुपारी तिने जेवणच केल नाही. म्हणजे कॅन्टीनमध्ये येऊन देखील. मी तिच्याच बाजूला, दोन खुर्च्या सोडून बसलेलो. ती बाजूला असली की जेवणाचा ‘खोळंबा’ होतो. घास गिळता येत नाही आणि श्वास घेता येत नाही. आणि मानही वर करून पाहता येत नाही. दुपारी पहिले तर ती पुन्हा ‘बिझी’. यार, प्रत्येक क्षण असा पटापट जात होता ना. शेवटी दुपारी साडेचारला तिला पिंग केल. तिला डायरेक्ट ‘तुला काही सांगायचे आहे’ अस कस बोलू? म्हणून म्हटलं थोडा विषय बदलू. खर तर हे ‘वू वू’ झालेलं. तिला पिंग करून विचारलं की, ‘तुझा आज उपास आहे का?’ तर ती ‘नाही’ बोलली. पुढे म्हणाली ‘मी का उपास करू?’.

मी तिला ‘मी पाहिलं’ अस म्हटल्याबर काय झाल कुणास ठाऊक. डायरेक्ट मला ती, तिच्याच शब्दात ‘व्हाय डू यु ऑब्जझर्व मी?’ म्हणाली. पाहून शॉकच बसला. म्हटलं म्हणजे ही ला सर्व काही समजलेलं दिसते आहे. काही शब्दच फुटेना. आणि काय प्रत्युतर द्यावे तेही कळेना. थोडा वेळ होतो न होतो. ती ऑफलाईन झाली. झाल ते पाहून डोळ्यातील ‘भाक्रा नांगल’ धरण फुटते की काय अस झालेलं. धरणातील पाण्याचा साठ्याने धोक्याची पातळी गाठलेली. त्यावेळी माझा मित्र माझ्या डेस्कवर आला. आणि त्याने ते कन्व्हर्सेशन पहिले. बर त्याला काय बोलाव आणि काय नाही. माझ्याकडे पाहून बोलला ‘काय झाल?’ त्याला ते वाच म्हणालो. तर तो ते पाहून, उलट मला काय झाल इतक त्यात?. त्याला म्हणालो त्याचा अर्थ काय होता? आल का लक्षात. तर तो ‘व्हाय?, डू यु ऑब्जझर्व मी?’ अस म्हणाला. यार एका सेकंदासाठी त्याचा खूप राग आला आणि दुसऱ्या सेकंदाला हसू फुटलेले. मग खरच काही सुचेनासे झालेलं.

डोक् इतक दुखायला लागलेलं. मी ताबडतोप आवराआवर करून पाचच्या कंपनीच्या बसने घरी आलो. असो, सगळच संपल अस वाटायला लागलेलं. पुढचे ठरलेले ‘शास्त्रीय गायना’चे कार्यक्रम केले. रात्रभर विचार केला. माझ्या जुन्या कंपनीतील माझ्या मैत्रिणीला ते वाक्य आणि ती चॅट दाखवल्यावर ती बोललेली की, डायरेक्ट आता तुझ्या मनातलं तिला सांग कारण तिला आता सगळ् कळल आहे. रात्री बारा साडेबाराला मित्राने फोन केला. खरच खूप बर वाटलेलं. म्हणजे ‘काय ठरवलं आहे?’ हे विचारण्यासाठी. तस् त्याने सलग तीन दिवस नित्यनियमाने मला रात्री झोप म्हणून फोन केलेले. पण त्यावेळेसही काही सुचेना. वाटलं आता ती का येईल? नाहीतर उद्या माझ्याशी बोलणार नाही. ना झोप आली ना विचार थांबले.

३१ डिसेंबर च्या दिवशी सकाळी लवकर आलो. येतांना मोरयाला मनोमन बोलायची संधी दे अस बोललेलो. तो मागील शुक्रवारी घातलेला टी-शर्ट पुन्हा घातला. तिला तो ड्रेस आवडलेला. खर तर माझ्या बहिणाबाईने मला तो तिच्या वाढदिवसाला घेतलेला. वाढदिवस तिचा आणि गिफ्ट मला. आता हे नेहमीचेच झाले आहे. असो, वाटलं होत ती सुद्धा सकाळी आली तर, डेस्कवर जाऊन तिला तुझ्याशी थोडे बोलायचे आहे, अस म्हणेन अस ठरवलेल. खूप वेळ वाट पहिली. पण ती येईना. आणि मनातील शंकासुराने गोंधळ घातलेला. त्यात ती नीट झोप न झाल्याने डोळे सुट्टी मागत होते. मनही बेचैन. शेवटच्या दिवशीच्या सगळ्या फॉरमॅलिटी केल्या. रुढी परंपरानुसार सगळ् ते डीएम, पीएम वगैरे लोकांनी फोनाफोनी करून आपले ‘कीप इन टच’ वगैरे केल. जणू काही मुलगी लग्न करून सासरी जातांना आई बापाला वाटणारी मुलीची काळजी ह्यांना माझ्याबद्दल वाटत होती. नाटकी आहेत एक नंबर!

मित्रांना सर्वांना ‘गुड बाय’चा इमेल टाकला. आणि तिला वेगळा इमेल केला. खर तर ती सर्वांपासून ‘खास’. पण मग इमेल लिहितांना राहवतच नव्हते. वाटलं त्यातच बोलून टाकावं. पण ते बरोबर वाटेना. कोर्सच्या वेळी माझ्या एका नाही दोघा मित्रांनी अशी इ-प्रेमपत्रे टाकलेली. सोडा ते. तोपर्यंत दहा वाजत आलेले. काहीच सुचेना. शेवटी तिला ‘गुड बाय’ च्या पहिल्या दोन ओळी लिहिल्या. आणि त्यापुढे कालच्या ‘त्या’ घडलेल्या गोष्टीबद्दल सॉरी बोललो. आणि आज मला तुझ्याशी बोलायचे आहे. तुला आज वेळ असेल तर कॉफी प्यायला जावूयात काय? अस लिहील. मग पुन्हा नको पाठवूयात अस वाटायला लागलेलं. पण केला बाबा शेवटी तो सेंड वर ‘क्लिक’. मग इतकी धडधड वाढलेली. म्हटलं आता ती जे समजायचे ते समजून जाणार!

ती आली. काय दिसते यार ती! आणि त्यात ती ज्यावेळी गुलाबी किंवा लाल रंगाचे, म्हणजे तसे काळ्या रंगाचे किंवा आकाशी. यार सोडा. ती प्रत्येक ड्रेसमध्ये खूप खूप आणि खूप छान दिसते. मला नक्की नाही सांगता येणार तो लाल की गुलाबी रंग पण ती खरच खूप छान वाटत होती. त्यात तिचे चालणे, पाहणे. ती आल्यावर त्या एसी मध्ये घाम फुटलेला. नाही मस्करी नाही. पण एक एक जण जणू मी देश सोडून चालल्या प्रमाणे गप्पा मारीत होता. पीसी अन लॉक करून पहिले तर तिचे पिंग. तिला ‘हाय’ म्हणून ‘सॉरी’ म्हणणार तेवढ्यात तिचे ‘काल तुझी मी चेष्टा करीत होते. पण तूच विषय वाढवतो आहेस’. मी पाहून काय बोलणार? खूप छान वाटायला लागलेलं. तिला आपला ‘नो प्रॉब्लेम’ बोलून मोकळा झालो.

तिने त्या ईमेलवर रिप्लाय ‘माझ्याकडे वेळ आहे’ असा दिला. एक मित्र आहेत एडमीन मध्ये त्यांच्या मदतीमुळे सगळी प्रोसेस पटापट झाली. त्यानंतर इतका आनंद झालेला की, दुपारी जेवायची भूकच लागली नाही. आणि तस् जेवणही काही खास नव्हते. तिला कस सांगू? हे विचार घोळत होते. जो तो आपला माझ्याशी बोलायचा. पण खरच मुडच नव्हता ते काही ऐकायला. जेवणानंतर, मित्रांनी ‘फेअरवेल’ ठेवलेलं. एक पांढऱ्या रंगाचा टी-शर्ट दिला. तिला पिंग करून चार वाजता कॉफीला गेले तर चालेल का? अस विचारलं ती ‘चालेल’ म्हणाली. नंतर माझ्या बाजूच्या टीमने देखील मला ‘फेअरवेल’. एकतर त्यांना काय सांगाव अस झालेलं. ते स्पीच सांगतांना समोर असलेल्या मुलीतही तीच असल्याचा भास व्हायचा. मग तोडक मोडक बोलून वेळ मारून नेली.

पण सारख वाटायचं आज मी जरा जास्तच ‘बंडल’ दिसत आहे. मी मित्रांना विचारलंही. पण सगळे आपले चांगला दिसतो आहेस बोलायचे. पण मनात हेच होते. शेवटी ते चार वाजले. थोडा उशीर झाला. पण एकदम मस्त. काय बोलू आणि काय नको अस होत होत. ती माझ्या सोबत! तिने स्वेटर घातलेला. पण त्यातही ती एकदम छान. खर सांगायचे झाले तर कॉफी घेऊन आम्ही दोघे कॅन्टीनमध्ये बसल्यावर, स्वप्नात असल्याप्रमाणे वाटत होते. ती माझ्याशी बोलतांना माझ सार लक्ष तिच्या त्या पाणीदार डोळ्यांकडे आणि त्या ओठांकडे होते. काय बोललो. ती इतकं मस्त बोलते ना! नुसत एकत् राहावे. ती बोलतांना तिचे डोळे. ती नजर! तिची हालचाल. सगळंच छान!

बस, स्वर्ग अजून कशाला म्हणतात? एक आनंद. मन तृप्त झालेलं. पण राहून राहून कस बोलू? ते घोळत होते. मला विषयच तो काढता येत नव्हता. म्हणजे कस सुरु करू तेच कळत नव्हते. शेवटी हिम्मत करावी म्हटलं आणि बोलायला सुरवात करणार. तेवढ्यात ती, पावणे पाच वाजले. माझी कॅब पाच वाजता आहे. मग वेळ किती पटकन गेला ते लक्षात आल. झाल! मला त्याक्षणी मला स्वतःलाच माराव अस वाटायला लागलेलं. वरती येतांना वेळच नव्हता. आणि जाम टेन्शन आलेल. फ्लोरवर आल्यावर दरवाजा उघडतांना ती मला ‘नवीन इमेल पाठवा’ म्हणाली त्यावेळी अजूनच जास्त बोर झाले. सगळ् पाण्यात गेल. माझ्यात खरच काही तथ्य नाही अस वाटायला लागलेलं.

डेस्कवर येतो तेच मित्राने खुणावलं. पण काय मी ‘नाही’ची मान डोलावली. काहीच सुचत नव्हत त्यावेळी. डोक् खूप जास्त जड झालेलं. म्हटलं देवाने इतकी छान संधी दिली. आणि मी ती वाया घालवली. मग काय मित्रांनी खूप झापायला सुरवात केली. आणि मलाही माझा खूप राग आलेला. माझे मित्र मला आता कॅन्टीनमध्ये चल म्हणून म्हणत होते. पण मग पुन्हा एकदा मनाचा हिय्या केला. आणि तिच्या डेस्ककडे गेलो. तस् निघतांना मित्र आता जाऊ नकोस म्हणून म्हणत होता. पण पुन्हा कधीच ती भेटणार नाही या विचाराने मला इतक अधीर केलेल होत ना. मला त्यावेळी तेच योग्य वाटले. तिच्या डेस्कवर जातांना तिची ती मैत्रीण तिथ तिच्या सोबत असली तर म्हटलं झाल कल्याण. पण तिचे उपकार म्हणायचे ती तिथे नव्हती. अप्सरा तिची बॅग भरत बसलेली. तिला म्हटलं ‘निघालीस?’ तर ती ‘हो’ म्हणाली. तिला म्हटलं ‘तुला थोड सांगायचं राहूनच गेल’. ती बोटांनी फोनची एक्शन करीत ‘मला फोन कर’ म्हणाली. मी आपला ‘तुझा नंबर माझ्याकडे..’ मग लक्षात आले की, उगाच खर सांगितलं तर बोंबल. तीला म्हटलं ‘माझा नंबर तुझ्याकडे आहे?’ तर ती ‘नाही’ म्हणाली. ती म्हणाली घे नंबर. आणि मी असलेला नंबर, नाही अशा अविर्भावात घेतला आणि तिला कॉल केला. झाल! ती गेली.

मित्र आपले ‘काय झाल?’ म्हणून विचारात होते. आणि मी नंबर घेतलेला सांगितल्यावर त्यावर कधी शिव्यांची लाखोली तर कधी टिप्स द्यायला सुरवात झाली. माझ डोक् बंद झालेलं त्यावेळी. मी सरळ त्यांना काहीही न बोलता माझ्या डेस्कवर आलो. तो संगणक उघडला. तर तिचा इमेल आलेला. त्यात ‘नवीन इमेल आयडी पाठव’ अस लिहिलेलं. मग मी माझा जीमेलचा आयडी आणि माझा फोन नंबर लिहून पाठवला. यार बहुतेक काहीतरी घोळ झाल अस वाटत आहे. असो, आता पाहता येणार नाही. म्हणजे घोळ झाला की नाही हे नक्की मला सांगता येणार नाही. पण झाल्यासारख वाटते आहे.

सोडा, खाली कॅन्टीनमध्ये येण्यासाठी जिन्यातून निघालो. मित्रांचे आपले तेच तेच ‘चान्स वाया घालवला’ म्हणून सुरु. खाली जातांना ती आल्याचा भास झालेला. म्हणजे तीच होती. काय माहीत यार, मला त्यावेळी काहीच समजत नव्हते. म्हणजे आहे अस वाटलेलं. मी माझ्या मित्राला बोलू नको अशी खुण केली. आणि पुन्हा पाहतो तर ती गायब. कॅन्टीनमध्ये आल्यावर त्यांना म्हटले तुम्हाला हवे ते घ्या मला काही नको. पुन्हा ती कॅन्टीनमध्ये असावी अस खूप वाटायला लागलेलं. देवाला मनात आपल तिची कॅब मिस होवू दे दर सेकंदाला सांगायला लागलो. आणि कॅन्टीनमध्ये सहज नजर टाकतो तर तो नारळ दिसला. आणि माझ्या बाजूला पाठ करून ती बसलेली.

काय सांगू? एकदम मस्त वाटायला लागलेलं. खरच, अस कस घडू शकत यावर विश्वासच बसत नव्हता. मग मनात, ती मला टाळायचे म्हणून तर मला म्हणाली नसेल की कॅब होती ते. किंवा मी जास्त बोर केल म्हणून. खरच मनात इतका गोंधळ उडालेला ना. माझा मित्र तुला काय बोलायचे ते एका पानावर सगळ् लिहून काढ आणि रात्री फोन करून बोल अस म्हणत होता. सोडा, हे काहीतरीच वाटले मला. पण तेवढ्यात तिचा मेसेज, की माझी कॅब मिस झाली. तुला काय बोलायचे होते?. मी तिला ‘तुला आता वेळ आहे?’. मित्र आपले तिला डायरेक्ट फोन लाव बोलत होते. पण तिने मेसेज केला म्हणून मी देखील मेसेज केला. तिचा ‘हो’ असा रिप्लाय आल्यावर धडधड जाम वाढली. मित्रांना दुसरीकडे जावून बस म्हणालो. आणि ते गेल्यावर तिला मी ‘मी कॅन्टीनमध्ये आहे. तुला यायला जमेल का?’. तर ती ‘मी सुद्धा कॅन्टीनमध्ये आहे’ असा मेसेज केला.

मी आपला वेड घेऊन पेड गावाला गेल्याप्रमाणे ‘वॉव, मला जॉईन करशील का? मी तुझ्यासाठी आणखीन एक कॉफी घेईल’. आणि वॉशरूम मध्ये जावे म्हणून उठलो तर ती मोबाईल मध्ये पाहत समोरून येत होती. तिला हाक मारून बोलावले. तर ती बोलली की, आपण कॅन्टीनमध्ये नको बसायला. इथे येणाऱ्या वासाने त्रास होतो आहे. आणि मला कॉफी नको. आपण इमारतीच्या दुसऱ्या बाजूच्या रिसेप्शनला बसूयात. मी आपला हो ला हो करीत गेलो. पण काय यार, तिथल्या सोफ्यावर आधीच एक ‘काकू’ बसलेल्या. काय बोलणार खुपच अवघडून गेल्याप्रमाणे वाटायला लागल. बर तशी ती नंतर उठून गेली. पण तिथे आवाज घुमतो. मग, धड वेळही नव्हता आणि बोलाण्यावाचून पर्यायही नव्हता. मित्रांनी सांगितलेल्या टिप्स प्रमाणे तिच्या डोळ्यात पाहून बोलण्यासाठी तिच्याकडे पहिले तर तिचेही माझ्याकडे लक्ष. मग उरली सुरली सगळी हिम्मत गेली. खुपच भीती वाटायला लागली. पण बोलाण्यावाचून खरच काहीच पर्याय नव्हता. ती मी कॅबची चौकशी करून आले म्हणून बाहेर गेली.

त्यावेळी जाम टेन्शन वाढलेलं. वाटलं उठून पळून जाव. कारण बोललो की ती नाराज होणार. आणि पुन्हा कधीच काही बोलणार नाही. पण थांबलो. ती येऊन बसल्यावर, शब्दच फुटेना. आणि सगळ् अंग थरथरायला लागल. बस! तिच्या डोळ्यात एकदा पहिले आणि पुन्हा मान खाली घालून बोललो ‘मला इथे सांगता येणार नाही. बाहेर जाऊया का?’ काय करणार यार. मी खरच खूप जास्त टेन्शनमध्ये आलेलो होतो. शेवटी हिम्मत करून’मी सांगितल्यावर तुला शॉक बसेल’ अस म्हणालो. बहुतेक ती समजली होती. मला म्हणाली ‘शॉक होईल अस काही बोलू नकोस’. मग वाटलेलं आता उठा आणि सरळ निघा. पण तिच्याकडे पहिले तर तिचा तो चेहरा. तो आवाक चेहरा. म्हणजे मोठे डोळे रागाने नाही. तिच्या चेहऱ्यावर बाहेरच्या उनामुळे चमकणाऱ्या फरशीचा प्रकाश. काय दिसत होती ती त्यावेळी.

मी पाहून, माझ तुझ्यावर प्रेम आहे. मला तू खूप आवडतेस. अस काहीसे बोलणार. पण तोंडून, आणि पूर्ण गडबडून, बोलतांना कंप येत होता. बारीक आवाजात ‘मला माहिती आहे याचे ओउटपुट. मला काही विचारायचे नाही आहे. बस सांगायचे आहे. मी इथ नाही बोलू शकत. आपण बाहेर जावून बोलुयात का?’ समोर आमच्या समोरच्या इमारतीला एक राउंड मारू अस म्हणून निघालो. यार, मग जे बोललो. पण काय माहीत तिला त्यातले किती कळले आणि काय कळले. खरच मी काय बोललो? मी तिला सगळ् खर खर सांगितलं. अगदी पहिल्या आवडलेल्या मुलीपासून ते तिच्यापर्यंत. मग मला तिने ‘माझ लग्न ठरलेलं आहे. नेक्स्ट इयर मध्ये करण्याचा प्लान आहे’.तिला ‘लव मॅरेज?’ अस विचारल्यावर, म्हणत होती की तिच्या घरच्यांच्या ओळखीचे कोणीतरी आहेत. त्यांचे आणि ही च्या घरच्यांचे चांगले संबंध आहेत. त्याला मी आवडते. आणि तिलाही तो आवडला. आणि त्यामुळे घरच्यांनी विरोध वगैरे काही केला नाही.

मला काहीच बोलावसं वाटत नव्हत. मी नुसता आपला मान डोलवित होतो. तिने ‘आता लग्न करून टाक’ असा सल्ला दिला. पुन्हा आमच्या इमारतीच्या जवळ आल्यावर तिने कॅब ची चौकशी केली. पण सहा वाजता, म्हटल्यावर ती थोडी त्रासून गेलेली. तिला म्हणालो अजून एक राउंड मारुयार? तर ती ‘नाही’ म्हणाली. मला खरच अजून खूप बोलायची इच्छा होत होती त्यावेळी. पुन्हा रिसेप्शन मधील सोफ्यावर बसल्यावर, मी तिला तिचे घेतलेले फोटो, पत्ता, इमेल आयडी आणि फोन नंबर. जे काही मी शोधल होत ते तिला सांगून टाकल. आणि तिला फोटो, देखील दाखवले. ती शॉक झालेली होती. पण नाराज नव्हती. तिला हे देखील सांगितले, जर तुझी इच्छा नसेल तर मी हे सगळ् डिलीट करून टाकील. तिने फोटो पहिले आहे. ते कुठे कुठे काढले ते सांगत बसलेली.

बस ती सांगतांना तिचा चेहरा. आहाहा! असो, ती सहाच्या कॅबने जाण्यासाठी निघाल्यावर सुद्धा मला बोलावसं वाटत होत. पण अतिरेक कधीही वाईट असतो. अरे हो, मी तिला ब्लॉगबद्दल देखील सांगितलं. तिथून निघाल्यावर मित्रांनी फोन करून बोलावलं. पण खर सांगू, आम्ही जवळपास म्हणजे चार पासून मधला थोडा वेळ सोडला तर सहा वाजेपर्यंत माझ्या सोबत होती. आणि मी खूप खूप बोललो. मला माहीत आहे. मी जे काही बोललो ते तिला किती लक्षात आले हा एक प्रश्नच आहे. पण काही का असेना. माझी इच्छा होती सगळ् सांगायची. आणि खर तर हे सगळ् आयुष्यात पहिल्यांदा मी अस सांगितलं. आणि तिचाही नकार असतांना न चीडचीड, न दुखावता तिने सगळ् ऐकून घेतलं. आणि नंतर निघाल्यावर मेसेज देखील केला मी नाराज नाही आहे म्हणून.

पण काय माहीत ती गेली आणि सगळंच बेकार वाटायला लागल. माझी ‘बॅटरी’ डाऊन व्हायला लागली. मित्रांमुळे थोडीफार चार्ज झालेली. घरी येण्याएवजी बहिणाबाईकडे गेलो. यार तिला कस काय माझ्या मनात काय ते कळत? माझा चेहरा पाहून ‘काय झाल बोलणार आहेस का?’ म्हणाली. मग तिला सांगितल्यावर मला समजावत बसली. अगदी एखाद्या लहान मुलाला जस् समजावतात तस्. नको नको म्हटलं तरी जेवणाला बसवलं. मस्त पण! खूप बर वाटलं. मी तिच्याकडून येतांना संगणक उर्फ हा नन्हा मुन्ना लॅपटॉप आणला. पण घरी येतांना, बॅटरी सगळी डाऊन झाली. मग ठरल्याप्रमाणे शास्त्रीय संगीताचा रात्रभर कार्यक्रम केला. सोडा, हे महत्वाचे नाही. तिने ब्लॉग वाचलेला. अगदी सगळ्या नोंदी. तस् तिने मला फोन करून आणि मेसेज करून देखील कळवले. असो, आणि तिने प्रतिक्रिया देखील दिल्या. मस्त एकदम!

अस आयुष्यात सगळ् इतक छान प्रथमच घडते आहे. ‘हरलेली लढाई’ हरून देखील एक आनंद होतो आहे. काल ती माझ्याशी ज्यावेळी फोनवर बोलत होती त्यावेळी तर अजूनच, कोणीतरी गुदगुल्या करीत आहे अस वाटत होते. मला माहिती आहे. जे व्हायचे तेच झाले. आणि हेच होणार असे माहिती होते. पण अस घडणार अस कधीच वाटलं नव्हते. ती आता आधीपेक्षा कितीतरी अधिक पटीने छान छान वाटते आहे. आणि ती खरच खूप मोठ्या मनाची आहे. तिने ते दोन तास जर दिले नसते तर कदाचित.. सोडा, मनाच्या जमिनीवर निर्माण झालेला हा वटवृक्ष माझ्याकडून जाळून टाकला जाणे अशक्य आहे. आणि अस पुन्हा कोणी मिळेल अस बिलकुल वाटत नाही. आणि पुन्हा कोणाकडे या नजरेने मी पाहूही शकत नाही. पण मी नक्कीच, माझ्यामुळे कोणालाच कोणताच त्रास होवू देणार नाही. आणि अडचणीतही आणणार नाही.

बस! एक विनंती आहे. यापुढे मी हा विषय काढणार नाही. बोलेल पण तिची इच्छा असल्यावर. मला माहीत आहे. विषय आता इतका स्वच्छ झाला असतांना देखील मी पुन्हा तीच री ओढतो आहे. आणि तीने दाखवलेला चांगुलपणा आणि मोठेपणाचा कदाचित मी फायदा घेतो आहे. पण देवाची शपथ घेऊन सांगतो, मी ह्या विषयामुळे कधीही कोणालाही चुकूनही गोत्यात आणणार नाही. मी नाराज वगैरे नाही. पण एकटेपणा जाणवतो आहे. खर तर परवा घरी ये अस आईने बजावलेल. पण नाही गेलो. मला आई वडिलांची खरच आता यावेळी जाम आठवण येते आहे. पण आता घरी जाऊन बसलो तर.. मनावर ताबा ठेवायचे मी कधीच शिकू शकणार नाही.

मी ते ‘तू प्यार है किसी ओर का.. तुझे चाहता कोई ओर है’ सारखी गाणी देखील ऐकत नाही आहे. दुख आणि आनंद एकाच वेळेस, हातात हात घालून आले आहेत. प्रत्येकाची आवड निवड वेगवेगळी असू शकते. आणि प्रत्येकच इच्छा माझी पूर्ण व्हावी असा काय कुठे नियम नाही. बापरे! पुन्हा किती बडबडलो. थांबतो इथे!


प्रतिक्रिया व्यक्त करा

आपला ई-मेल अड्रेस प्रकाशित केला जाणार नाही.